आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहार प्रकरण:घोटाळा नेमका कसा झाला; पैसे कसे फिरवले गेले याचा तपास

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील द्वारकादास मंत्री बँकेत झालेल्या २२९ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासाला गती देण्याचा प्रयत्न होत आहे. बँकेच्या व्यवहारांच्या तपासणीसाठी व २२९ कोटी रुपयांचा प्रवास कसा झाला हे शोधण्यासाठी आता बँकेच्या व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईच्या एका एजन्सीची पोलिसांनी नेमणूक केली आहे.

बीड येथील द्वारकादास मंत्री बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी संचालकांनी २२९ कोटींचा अपहार केल्याची तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी बँकेचे माजी २० संचालक व ५ अधिकारी अशा एकूण २५ जणांवर अपहारप्रकरणी गुन्हा नोंद केला होता.यातील संचालकांना सत्र न्यायालयाने सुरुवातीला अंतरिम व नंतर कायम जामीन मंजूर केला, तर ५ अधिकाऱ्यांना अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यातील एका संचालकाचे गुन्हा नोंद झाल्यानंतर निधन झालेले आहे.

घोटाळा नेमका कसा केला गेला, पैसे कसे फिरवले गेले, काय अनियमितता यात झाली. यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. काही काळ प्रभारी पोलिस अधीक्षक असलेले पंकज देशमुख हे स्वत: आर्थिक गुुन्हे शाखेचे प्रमुख होते. त्यामुळे गुन्ह्यांबाबत तांत्रिक माहिती त्यांना होती. यामुळे त्यांच्या काळात त्यांनी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेऊन यासाठी एजन्सीही नियुक्त करण्याची प्रक्रिया पार पाडली होती.

डेटा घेतला कॉपी करून
द्वारकादास मंत्री बँकेत घोटाळा होऊन या प्रकरणात गुन्हा नोंद असला तरी बँक बंद पडलेली नाही. सध्या बँकेवर प्रशासक कार्यरत आहेत. बँकेचे व्यवहारही सुरू आहेत. त्यामुळे कामकाजाच्या हार्ड डिस्क फॉरेन्सिक ऑडिटला थेट घेण्याऐवजी या हार्ड डिस्क कॉपी करून घेतल्या आहेत, त्यामुळे बँकेच्या सध्याच्या कामकाजाला कोणताही अडथळा येणार नाही.

जामीन रद्द करण्यासाठी याचिका
^या प्रकरणात माजी अध्यक्ष सुभाष सारडांसह इतरांवर गुन्हे नोंद आहेत. जामीन देताना न्यायालयाने सर्वांना पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची अट घातली होती. मात्र, कुणीही तपासात सहकार्य केलेले नाही असे म्हणत आर्थिक गुन्हे शाखेने सारडांसह इतरांचे जामीन रद्द करावेत यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.
-सुजित बडे, सपोनि., आर्थिक गुन्हे शाखा, बीड

ठेवीदार हित संरक्षण कायद्याचे कलम वाढले
शिवाजीनगर ठाण्यात सुरुवातीला गुन्हा नोंद होताना केवळ अपहारप्रकरणी गुन्हा नोंद केला हाेता. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास आल्यानंतर यात आर्थिक गुन्हे शाखेने एमपीआयडी कलम म्हणजेच ग्राहक किंवा ठेवीदार हित संरक्षण कायद्याचे कलम वाढले आहे. त्यामुळे गुन्हा नोंद असलेल्या माजी संचालकांच्या अडचणीत वाढ झाली.

धनादेश क्लिअरिंगला न पाठवताच दिले कोट्यवधी
बँकेने अनेक ग्राहकांवर विशेष मर्जी दाखवत त्यांचे धनादेश क्लिअरिंगसाठी न पाठवता या कोट्यवधी रुपये अदा केले होते. आरबीआयने याबाबत बँकेला खुलासा मागितला होता. हा सर्व घोटाळा २०१४ ते २०२० या काळात झाला. बँकेचे अध्यक्ष सुभाष सारडा यांनी त्यांच्या आदित्य एज्यूकेशन ट्रस्टमध्ये कोणतेही व्याज बँकेला न देता कोट्यवधी रुपये वापरले होते.असा ठपकाही ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...