आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा:सात केंद्रांवर दाेन हजार 489 उमेदवारांची परीक्षा

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा (पूर्व) परीक्षा २१ ऑगस्ट रोजी बीड जिल्हा केंद्रात एकूण ७ उपकेंद्रामधून २ सत्रात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण २ हजार ४८९ उमेदवार बसलेले आहेत. परीक्षा कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू केलेला आहे.

आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे परीक्षार्थींना मोबाइल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रिक वस्तू व अभ्यासाचे साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येणार नाही. मात्र, जेवणाचा डबा, अल्पोपाहार आणि पाण्याची बाटली घेऊन येण्यास परवानगी राहील. दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील.

परीक्षेच्या वेळी प्रवेश पत्रासोबतच त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हींग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षेसाठी परीक्षा उपकेंद्रावर पेपर क्रमांक १ व २ साठी सकाळी ८.३० वाजेपूर्वी उपस्थित राहण्याबाबत सूचना केल्या आहेत. परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश दिला जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी कळवले आहे. तसेच काेराेना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी केलेल्या सर्व सूचना, आदेशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे असेही राऊत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...