आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजामध्ये लोप पावत चाललेली लोककला आणि नाव जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रात गावोगावी कला सादरीकरण करत आहे. महाराष्ट्राची लोककला जिवंत राहिली पाहिजे. त्यासाठी शासनाच्या मदतीची आम्हा कलावंतांना गरज असल्याचे मत तमाशा फड मालक मालतीबाई इनामदार यांनी व्यक्त केले. प्रतिवर्षीप्रमाणे दोन महिने चालणाऱ्या देवदहीफळ (ता.धारुर)येथील यात्रेत प्रत्येक रविवारी प्रेक्षक रसिकांसाठी तमाशाचा फड रंगतो. पहिल्या रविवारी (ता.४) महाराष्ट्रामध्ये नावाजलेला मालती इनामदार यांचा लोकप्रिय तमाशाचा फड चांगलाच रंगला. याप्रसंगी ईनामदार यांनी तमाशाची कैफियत मांडली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मागील काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया, कोणत्याही आधुनिक सुविधा नव्हत्या.
मात्र आज तमाशाची हालत बिघडत चालली आहे. त्यावेळी तमाशा आदि लोककला व समाजजागृती, सांस्कृतीक कार्यक्रमांच्या मैफिली रंगत होत्या. आज आव्हाने वाढली आहेत. कला सादरीकरण करताना अनेक अडचणींवर मात करत फड टिकवणे अवघड जाते आहे. काही प्रेक्षक नाहक त्रास देत फडाला नुकसान पोहचवतात. त्यात उत्पन्न कमी झाले आणि खर्च वाढल्याने येत्या काही काळात तमाशे बंद होण्याच्या मार्गावर असल्याची खंत मालती इनामदार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
लोककलेला दाद देणारी माणसं जुन्या पिढीत होती. मात्र समाजसुधारणा, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय ठेवा योग्य रित्या जपण्यासाठी आणि लोककला जिवंत राहण्यासाठी समाजाने अशा कार्यक्रमांना दाद देणे गरजेचे आहे. तमाशा हा गण, गौळण, लावणी, बतावणी आणि वग अशा पाच अंगांनी समृद्ध झालेला आहे. कला सादरीकरणाचा आनंद व उत्साह आता म्हणावासा राहिला नाही.
तीस वर्षांपूर्वी सुरू केलेला मालती इनामदार यांचा फड आता मरणासन्न अवस्थेत आहे. फडात काम करणाऱ्या कलावंतांच्या मुलांना शिक्षणाची देखील कोणतीही व्यवस्था शासनाने केलेली नाही. जवळपास ८० कलाकार व मजुरांचे पोट भरणे जिकरीचे झाले असून, नावासाठी फक्त तमाशा करत असल्याचे विधान इनामदार यांनी व्यक्त केले. यावेळी फडातील इतर तमाशा कलावंत व कारागिर मोठ्या संख्येने हजर होते.
उत्पन्न घटले, खर्च वाढला काही वर्षांपूर्वी एका-एका फडात तीन-चार हजार प्रेक्षक असायचे. आता हजारापेक्षा कमी संख्या एका-एका कार्यक्रमात आहे. महाराष्ट्रात एका यात्रेतुन दुसऱ्या यात्रेला जाण्यासाठी पन्नास हजारांच्या वर खर्च येतो आणि कमाई काही हजारांत असल्याने आमचा उदरनिर्वाह भागत नाही. आमची परिस्थिती समजून घेत शिंदे सरकारने आम्हा सर्व कलाकारांना मानधन व पगार सुरू करण्याची गरज आहे. प्रवासादरम्यान गाड्यांना दहा हजारांपर्यंत टोल भरावा लागतो. तो देखील माफ केला तर शासनाकडून मोठी मदत होईल, असे फड मालक मालती ईनामदार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.