आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाती-धर्माने देशभरात सामाजिक दरी वाढतेच आहेच. तथापि, आधुनिक भांडवलदार वर्गाकडून जात-धर्माच्या नावाने बहुजनांचे आर्थिक शोषण होत असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रा.डॉ. भिष्मा रासकर यांनी केले.
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील महिला महाविद्यालयात ‘मराठी विभागाच्या’ वतीने प्रोफेसर डॉ. भिष्मा रासकर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर या होत्या. महिला महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. भिष्मा रासकर हे नियत वयोमानाने सेवानिवृत होत असल्याच्या औचित्याने महाविद्यालयाच्या मराठी विभागाने ‘आयुष्यावर बोलू काही’ या उपक्रमांतर्गत त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. मराठी विभागप्रमुख ज्येष्ठ नाटककार प्रा. बापू घोक्षे आणि कवी प्रोफेसर डॉ. नामदेव शिनगारे यांनी त्यांची सर्वस्पर्शी मुलाखत घेतली.
याप्रसंगी प्रश्नांना उत्तरे देतांना प्रोफेसर डॉ. भिष्मा रासकर यांनी आपल्या आयुष्यातील आठवणी आणि किस्से सांगत सामाजिक, राजकिय, आर्थिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक सद्यस्थितीचा परामर्श घेतला. या सर्व स्तरावर ढासळलेली नितीमूल्ये आणि देश ऐक्याला घातक असलेले वातावरण याविषयीही त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला. सामान्य माणसाचे जीवन आणि दुःख मांडणारे साहित्यच शाश्वत साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांच्या चिंतनातूनच देश घडण्याची प्रक्रिया होते
डॉ. रासकर यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाविद्यालय आणि विद्यार्थिनी एका उत्तम भाष्यकार प्राध्यापकाला मुकणार आहे. प्राध्यापकांनी सभोवतालाविषयी कायम सतर्क असणे गरजेचे असल्याचे सांगून प्राचार्य डॉ. परळीकर म्हणाल्या शिक्षकांच्या चिंतनातूनच देश घडत असतो. त्यामुळे इतर प्राध्यापकांनीही अशा पध्दतीने विचार विनिमय केला पाहिजे, असे प्राचार्य डॉ.कांचन परळीकर यांनी सांगितले. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.बापू घोक्षे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. नामदेव शिनगारे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.