आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिदान दिन:नेत्रसंकलन केंद्राचे अखेर झाले नूतनीकरण ;कोविडनंतर नेत्रसंकलन होते ठप्प ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित करून वेधले होते लक्ष

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंधांच्या आयुष्यात प्रकाश वाट निर्माण करणाऱ्या बीड जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाच्या नेत्र संकलन केंद्र कोरोनानंतर नूतणीकरणा अभावी ४ महिन्यांपासून बंद होते. यामुळे नेत्रदान चळवळ ठप्प झाली होती. दिव्य मराठीने याबाबत वृत्त प्रकाशीत केल्यानंतर अखेर, नेत्र संकलन केंद्राचे परवाना नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे आता नेत्र संकलनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

डॉ. भालचंद्र यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दहा जून हा दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्ह्यात मागील काही वर्षांत नेत्रदान चळवळीने गती घेतली होती. सन २०११ पासून नेत्र जिल्हा रुग्णालयात नेत्र संकलन करण्यात येते. नेत्रदानाबाबत झालेली जागृती, समुपदेशक, पोलिस चौकीतील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात नेत्रदान चळवळीने गती घेतली होती.

सन २०११ ते २०२० या काळात सुमारे ४०४ डोळ्यांचे संकलन बीड जिल्ह्यात करण्यात आले होते. हे डोळे जालना येथील गणपती नेत्र रुग्णालयात पाठवले जात असत यातून अंधांना दृष्टीदान देण्यास जिल्हा योगदान देत होता. बीडच्या नेत्र विभागाची कामगिरी राज्यात अव्वल ठरत होती. चांगले काम सुरु असताना मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्ग सुरू झाला.

कोरोना मृतांचे नेत्र संकलन करता येत नव्हते तर, जिल्हा रुग्णालयातही पूर्ण कोरेाना बाधितांवरच उपचार सुरु होते. त्यामुळे नेत्र संकलन बंद होते. डिसेंबर २०२१ मध्ये पुन्हा नेत्र संकलन सुरू केले गेले. मात्र, या ६ डोळ्यांचे संकलन केल्यावर जानेवारी २०२२ मध्ये उपसंचालक कार्यालयाच्या पथकाकडून झालेल्या तपासणीत बीडच्या नेत्र संकलन केंद्राचा परवाना नूतनीकरण नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर नेत्रदान ठप्प होते.

घरी जाऊन नेत्रसंकलन
एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर सहा तासां पर्यंत त्याचे नेत्रदान करता येते. नातेवाइकांनी यासाठी पुढाकार घ्यावा. सुमारे ६० किमी पर्यंत आम्ही मृतांच्या घरी जाऊनही नेत्र संकलन करतो. नेत्रदानाबाबत जागृती व्हावी यासाठी नेत्रदानाचे अर्जही भरुन घेतले जातात.
- चंद्रभागा गुरव, नेत्रदान समुपदेशक, जिल्हा रुग्णालय.

नेत्रदान हे श्रेष्ठदान
नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. यातून आपण आपल्या प्रिय जणांच्या स्मृती नेत्र रुपाने जीवंत ठेऊ शकतो. त्यांच्या डोळ्याने दोन अंध जग पाहू शकतात.यासाठी नातेवाईक, समाजाने पुढाकार घेऊन मृतांचे नेत्रदान करावे.
- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

चार महिन्यांपासून नेत्र संकलन होते ठप्प
दरम्यान, संचालक कार्यालयाला प्रस्ताव पाठवूनही नूतनीकरण केले जात नसल्याने जिल्ह्यात चार महिन्यांपासून नेत्र संकलन ठप्प असल्याची बाब दिव्य मराठीने समोर आणली होती. याबाबत १३ मे रोजीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले गेले होते. त्यानंतर संचालक कार्यालयाने बीड जिल्हा रुग्णालयाचे परवाना नूतनीकरण केले.

बातम्या आणखी आहेत...