आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:टेंबे गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष

माजलगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जोशी गल्लीमध्ये असलेल्या टेंबे गणपतीचे विसर्जण भाद्रपद प्रतिपदेला रविवारी ( ११ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता विधीवत पुजा करून आरती करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने अवघा परिसर दणाणून गेला होता. यासोबतच मिरवणुकीत असलेल्या सजीव देखाव्यांनीही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. कोविडच्या संकटानंतर पार पडलेल्या या पारंपरिक मूर्ती विसर्जन उत्सवातून भाविकांना वेगळ्याच ऊर्जेची अनुभूती मिळाली.

१२२ वर्षांची परंपरा असलेला व नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या टेंबे गणपतीच्या उत्सवाचे वेगळेपण राज्यासह बाहेरराज्यातही ओळखले जाते. निजाम राजवटीत या टेंबे गणपतीची मिरवणूक परवानगीच्या कारणावरून थांबविण्यात आली होती. यानंतर रितसर ताम्रपटावर हैदराबाद येथून घोड्यावर प्रवास करत परवानगी आणण्यात आली होती. यामुळे या गणपतीची स्थापना एकादशीला होते तर विसर्जन प्रतिपदेला होते. शेणा- मातीपासून या गणपतीची मूर्ती तयार केली जाते.

दरम्यान, यंदा प्रथेनुसार ६ सप्टेंबरला विधीवत पुजा करत या गणपतीची स्थापना करण्यात आली होती. पाच दिवस टेंबे गणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बालकांसाठी दंत तपासणी शिबिर, रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमांत नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला. गोरगरिब, वंचित, उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी वही, पेन देण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अनंतशास्त्री जोशी यांनी केले होते. याला भक्तांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत वही व पेन श्रीचरणी अर्पण केले. रविवारी भक्तीमय वातावरणात व गणेश भक्तांनी उत्साहात टेंबे गणपतीला भावपूर्ण निरोप दिला. नवसाला पावणारा गणपती म्हणून या टेंबे गणपतीची ओळख आहे. त्यामुळे नवसपूर्तीसाठी अनेक गणेशभक्तांनी मानाचे टेंबे या श्रीविसर्जन मिरवणुकीमध्ये हाती घेतले होते. श्रीविसर्जन मिरवणुकीत आकर्षक सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये टेंबे गणपतीची मुर्ती ठेवण्यात आली होती. श्री गणेशाचे चौकाचौकात आरती करण्यात आली. यासह गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने अवघी माजलगाव नगरी निनादून गेली होती. पारंपरिक वेशभूषेसह भाविकही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेषशायी पद्मनाभाचा देखावा ठरला विशेष आकर्षण
श्री टेंबे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत सजीव देखावे सहभागी करण्यात आले होते. मिरवणुकीतील दुसऱ्या तिसऱ्या ट्रॅक्टरमध्ये भगवान शेषशायी पद्मनाभ यांचा देखावा सादर करण्यात आला होता. यासोबतच तिसऱ्या ट्रॅक्टरमध्ये अंदमानातील वीर सावरकर हा सजीव देखावाही सादर करण्यात आला होता. या दोन्ही देखाव्यांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच कलावंतांचे कौतुक केले. दरम्यान, उत्सव पार पाडण्यासाठी यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासह चौकाचौकात आरती करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...