आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सावकारी चक्रवाढीत अडकला बळीराजा:दोन वर्षांत 2 हजारांचे व्याजासह केले 28 हजार...वसुलीसाठी सावकाराची कपडे फाटेपर्यंत मारहाण; शेतकऱ्याची आत्महत्या

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून कैफियत; फरार सावकारविरुद्ध गुन्हा दाखल

दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या दोन हजार रुपयांचे सावकाराने व्याजासकट २८ हजार केले. त्यानंतर पैशांसाठी तगादा लावून शेतकऱ्याची दुचाकी ठेवून घेत कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. सावकाराच्या छळाला कंटाळून गंगाराम विश्वनाथ गावडे या शेतकऱ्याने झाडावर गळफास लावून घेत स्वत:चे जीवन संपवल्याची घटना रविवारी सकाळी बीड तालुक्यातील राजुरी (नवगण) येथे उघडकीस आली. मृत्यूपूर्वी शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर सावकार फरार झाला आहे.

शेतीतील अल्प उत्पन्नामुळे ऊसतोड कामगार म्हणून काम करणारे गंगाराम हे आर्थिक परिस्थितीमुळे विवंचनेत असायचे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी गावातीलच लाला ऊर्फ युवराज पांडुरंग बहिर या खासगी सावकाराकडून दोन हजार रुपयांची रक्कम दहा टक्के प्रतिमहिना व्याजाने घेतली होती. दोन वर्षांत सावकाराने त्यांची ही रक्कम व्याजासकट २८ हजार रुपये केली. पैशांच्या वसुलीसाठी युवराजने गंगाराम यांच्याकडे तगादा सुरू केला. मारहाणीच्या धमक्या दिल्याने गंगाराम तणावाखाली होते. शुक्रवारी (दि.९) सावकार युवराज बहिरने घरी जाऊन पुन्हा गंगाराम यांना धमक्या दिल्या. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता सावकाराने गंगारामला स्वत:च्या शेतात बोलावून घेतले. गंगारामची दुचाकी (एमएच २३ एस ९८३९) ठेवून घेत त्याने गंगारामला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. पुतण्याने दिलेले कपडे घालून गंगारामने कसेबसे घर गाठले. त्यानंतर ते प्रचंड तणावात होते. अखेर रविवारी (दि.११) पहाटे ३ वा.च्या नंतर गंगाराम यांनी घरापासून जवळ असलेल्या चिंचेच्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सावकार युवराज बहिर याच्यावर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी सावकार फरार झाला असून बीड ग्रामीण पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माळी करत आहेत.

चिठ्ठीतून मांडली कैफियत :

गंगाराम यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या खिशातील बँक पासबुकच्या झेरॉक्सच्या पानावर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात, युवराज बहिर याने आपल्याला कसा त्रास दिला, कशी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली, अजूनही आपले कपडे त्याच्याच शेतात पडलेले आहेत, असे सांगत आपली कैफियत मांडली.