आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाच्या दिशेेने पाऊल:चार गावांतील शेतकऱ्यांचा भाजीपाला अन् फळपिकेच घेण्यावर भर

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवर्षणाचा सामना सातत्याने करत असलेला भौगोलिक परिसर. त्यात पारंपरिक शेतीतून पुरेसे उत्पादन होत नसायचे. मात्र, या अडचणीवर मात करत व काळानुरूप शेतीत आवश्यक ते बदल करत भाजीपाला, फळपिके व इतर पिकांचे उत्पादन घेत पाटोदा तालुक्यातील दासखेड, वैजाळा, वैद्यकिन्ही, सोनेगाव येथील शेतकऱ्यांनी यशाच्या दिशेेने पाऊल टाकले आहे. या परिसरातील दीडशेवर शेतकरी आज बीडसह राज्यातील विविध भागात शेतमाल विक्री करताहेत.

गेल्या काही वर्षांचा अपवाद वगळता पाटोदा हा सातत्याने अवर्षणाचा सामना करणारा तालुका. त्यात दासखेड, वैजाळा, सोनेगाव, वैद्यकिन्ही या गावांत सिंचन सुविधांची अनुपलब्धता. त्यामुळे पारंपरिक पिकांवरच शेतकरी अवलंबून होते. परंतु, खर्च वजा जाता हाती फारसे काही पडत नसे. सन २०१३ मध्ये या भागातील शेतकरी केशव रसाळ यांनी आपल्या १२ एकर क्षेत्रावर पारंपरिक पिके सोडून भाजीपाला, फळपिके व इतर पिकांची लागवड सुरू केली. तत्पूर्वी त्यांनी ४० बाय ४० चा शेततलाव करत पाण्याची व्यवस्था केली.

ठिबक, तुषार सिंचनाचाही त्यांनी आवश्यकतेनुसार वापर केला. प्रगतिशील शेतकरी उद्धव बावणे यांनीही मार्गदर्शन केले. सुरुवातीच्या टप्प्यात बीड, लातूर, नगर येथील व्यापाऱ्यांसह स्थानिक व्यापाऱ्यांनी भाजीपाल व इतर शेतमाल थेट जागेवरून नेल्याने त्यांचा उत्साह वाढला. रसाळ यांनी इतरही शेतकऱ्यांना भाजीपाला व इतर पिकांकडे वळण्याचे आवाहन केले. त्यानुसार एकमेकांचे पाहून, अनुभव, ज्ञान व माहिती यांचे आदानप्रदान करत शेतकऱ्यांनी भाजीपाला, डाळिंब, टरबूज, खरबूज यासह इतर मोसमी पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. या शेतकऱ्यांचा भाजीपाला आता कल्याण, नाशिक, नागपूर, पुणे, नगर या भागातील व्यापारी थेट शिवारात येऊन खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतीतून आर्थिक सुबत्ता येण्यास सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...