आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई तालुक्यात एका शेतकऱ्याने शेतामधील ऊस पेटवून देत गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मदत केली जाईल तसेच जिल्ह्यात अतिरिक्त ऊस प्रश्न गंभीर असून दहा लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक राहू शकेल अशी भीतीदेखील जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी वर्तवली आहे. मात्र, शासनामार्फत शिल्लक ऊसासंदर्भात योग्य नियोजन केले जाईल असेही त्यांनी आश्वासित केले आहे.
जिल्ह्यात यंदा उसाचे उत्पादन विक्रमी झाले आहे. काही कारखान्यांनी उशिरा गाळप सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस पूर्ण क्षमतेने जाईल की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच परिस्थितीत गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव या ३२ वर्षे शेतकऱ्याने शेतांमध्ये जाऊन ऊस पेटवून दिला आणि गळफास घेत आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेची माहिती जिल्हाधिकारी शर्मांना कळतात त्यांनी घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत शासनाकडून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देऊन सांत्वन केले. यानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी शर्मांनी पत्रकार परिषद घेतली, ते म्हणाले जिल्ह्यामध्ये उसाचे एकूण लागवड क्षेत्र ते ८५ हजार हेक्टर असे आहे.
त्याची सरासरी उत्पादन ५५लाख मेट्रिक टन असे होईल. सध्या दिवसाला २७ हजार ६५० मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याची क्षमता कारखान्याची आहे त्या क्षमतेनुसार ३१ मे अखेरपर्यंत दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, अशी स्थिती नाही. परिणामी शासन स्तरावर उसाचे नियोजन आणि तेही जाहीर केले जाईल. शेतकऱ्यांनी अशा अनुचित घटना करून कुटुंबीयांना दुर्दैवी संकटात टाकू नका, असे आवाहनही जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.
साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
जिल्ह्यातील ऊस प्रश्नाने अखेर गंभीर स्वरूप घेतल्याने गेवराई तालुक्यात शेतकऱ्याने ऊस पेटवून देत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना केवळ शासन आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे झाली. या प्रकरणी साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ऊस उभा राहिला तर शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे नेते गंगाभिषण थावरे यांनी केली.
पीडित जाधव कुटुंबीयांना मदत केली जाईल
हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव या शेतकऱ्यांने ऊस जात नसल्या कारणाने नैराश्यातून उसाच्या फडाला आग लावली व त्यानंतर त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पीडित परिवारांची भेट जिल्हाधिकारी शर्मांनी घेतली. या वेळी सर्व शासकीय योजनांचा लाभ पीडित परिवाराला मिळवून देण्याचे अश्वासन दिले. या वेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार सचिन खाडे, मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले, तलाठी विठ्ठल आम्लेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.