आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:सुकळी येथे पत्नीचा खून करून आत्महत्येचा बनाव ; अखेर नवविवाहितेच्या मृत्यूचा छडा

सिरसाळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरसाळा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या व धारूर तालुक्यात असलेल्या सुकळी येथे दहा दिवसांपूर्वी विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सासरच्या मंडळींवर नोंदवला गेला. मात्र आता या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून पतीनेच पत्नीला विहिरीत ढकलून दिल्याचे समोर आले आहे.

राणी गणेश राऊत (२१) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ७ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. सुरुवातीला पाणी आणण्यासाठी त्या गेल्या असता पाय घसरून विहिरीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची बाब सासरच्या मंडळींनी सांगितली होती. नंतर तिने आत्महत्या केल्याचे सांगितले होते. या प्रकरणी सुरुवातीपासून राणी यांच्या माहेरच्या मंडळींकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, या प्रकरणी राणी यांची आई मिरा लांडगे यांच्या तक्रारीवरून सिरसाळा पोलिसांत पती, गणेश ज्योतिराम राऊत, सासू सुनीता ज्योतीराम राऊत, सासरा ज्योतीराम सोपान राऊत यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला गेला होता. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते.

न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, पोलिस कोठडीच्या काळात पोलिसांनी सर्वांकडे कसून चौकशी केली. यात, पती गणेश राऊत याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच गणेश याने आपणच इतरांच्या मदतीने राणीला विहिरीत ढकलून देत खून केला व नंतर आत्महत्येचा बनाव केल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात आता खुनाचे कलम वाढवण्यात आले असल्याची माहिती सिरसाळा पोलिसांनी दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेळके हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...