आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने लाखो रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे वर्षभरापासून दुरुस्तीअभावी बंद होते. नगरपालिकेने कंत्राटदाराचे बिल वेळेत न दिल्याने कंत्राटदाराने दुरुस्ती केली नव्हती. अखेर, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न मार्गी लावला असून ६० पैकी ५५ कॅमेरे वर्षभरानंतर सुरू झालेत.
तत्कालीन एसपी अनिल पारसकर व जी. श्रीधर यांच्या काळात शहरातील प्रमुख चौकांमध्ये ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. काही काळ या कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्ती झाली. मात्र, माजी पोलिस अधीक्षक आर. राजा यांच्या काळात या कामाकडे दुर्लक्ष झाले. पोलिस विभाग आणि नगरपालिका यांच्यात समन्वय राहिला नव्हता. या कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्तीसाठी नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र, त्यासाठी आर. राजा यांनी कोणताही पुढाकार घेतला नव्हता. परिणामी लाखो रुपये खर्चून बसवलेले कॅमेरे बंद स्थितीत होते. काही खांब पडले होते, तर काही कॅमेरे फुटले होते.
शहरातील वाढती गुन्हेगारी, विविध घटना लक्षात घेता सीसीटीव्ही हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने, एखादी घटना घडल्यास गुन्हेगार व पुरावा शोधण्यासाठी कामी येतो. मात्र, तेच बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवलेले असतानाही केवळ देखभाल, दुरुस्तीअभावी ते बंद असल्याचे एसपी ठाकूर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून देत पालिकेला सूचना देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी शर्मांनी एसपी ठाकूर, पालिका मुख्याधिकारी उमेश ढाकणे व कंत्राटदार निखिल मुंडे यांच्यात बैठक घेऊन पालिकेला सूचना देत विषय मार्गी लावला. सीसीटीव्हीची दुरुस्ती, आवश्यक तिथे नवे कॅमेरे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही आवश्यक
बीड शहरातील कॅमेरे सुरू झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात डीपीसीच्या निधीतून माजलगाव, अंबाजोगाई या शहरातही कॅमेरे बसवले जाणार आहेत. परळी, गेवराई व अन्य ठिकाणी जिथे कॅमेरे असतील व नादुरुस्त असतील त्या ठिकाणची दुरुस्तीची कामेही करून घेतली जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही आवश्यक आहेत.
- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड.
अन्य कॅमेऱ्यांचे काम लवकरच सुरू करणार
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. बंद असलेले ५५ कॅमेरे आतापर्यंत सुरू केले आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात सीसीटीव्ही फुटेज दिसण्याची व्यवस्था आहे. उर्वरित कॅमेऱ्यांचे कामही लवकरच केले जाणार आहे. -निखिल मुंडे, निखिल नेटवर्कस, बीड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.