आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैद्यनाथ कारखान्यास 10.77 कोटींची थकहमी:थकहमीचा योग्य वापर व्हावा : धनंजय; निर्णयाचे इतरांनी श्रेय घेऊ नये : पंकजा

परळी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ३२ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील ३२ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात बीड जिल्ह्यातील माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास १० कोटी ७७ लाख रुपयांची थक हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या थक हमीवरून मुंडे भावा-बहिणीत कलगीतुरा सुरू झाला आहे. मंत्री धनंजय मंुडे यांनी थकहमीचा कारखाना प्रशासनाने योग्य वापर करावा, असा सल्ला दिला. यावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया नोंदवताना, थकहमीचा निर्णय मी मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने घेतला गेला. यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वैद्यनाथसह राज्यातील आणखी एकूण ३२ सहकारी साखर कारखान्यांना थक हमी देऊन त्या कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यंदा परळी तालुका आणि परिसरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असून कारखाना सुरू होऊन सर्व उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या व अनेक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण कारखाना या विषयात राजकारण आणणार नाही, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. तथापि, साखर कारखान्यावरून या भावंडांत कलगीतुरा होण्याची चिन्हे आहेत.

शेतकरी, कर्मचाऱ्यांचे पैसे देऊन वैद्यनाथ सांभाळा : धनंजय मुंडे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी अथक प्रयत्नातून वैद्यनाथ कारखान्याला आशिया खंडात अग्रस्थानी नेऊन ठेवले होते. त्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांवर पगारासाठी उपोषणाची वेळ यावी, हे अत्यंत दुर्दैवी होते. राज्य सरकारने दिलेल्या थकहमीचा कारखाना प्रशासनाने योग्य वापर करून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे हित जोपासावे, थकीत बिले आणि पगार करावेत, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ कारखाना प्रशासनास दिला आहे.

यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - पंकजा मुंडे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील , ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार आणि साखर कारखाना संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाख रुपये थकहमी मंजूर केली आहे, यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. कारखान्यांची यादी यापूर्वीच जाहीर झाली होती, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

बातम्या आणखी आहेत...