आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड झीरो रिपोर्ट बीड:मास्कसाठी दंड, मात्र अंमलबजावणी नाही, फिजिकल डिस्टन्सचाही विसर

बीड / दिनेश लिंबेकर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील कोविड सेंटरवर सर्वत्र घाण पसरली असून रुग्णांचे हाल होत आहेत. - Divya Marathi
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील कोविड सेंटरवर सर्वत्र घाण पसरली असून रुग्णांचे हाल होत आहेत.
  • एप्रिलमध्ये 1 रुग्ण असलेल्या बीड जिल्ह्यात 6 महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारांवर

एप्रिल महिन्यात केवळ एक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या बीड जिल्ह्याची संख्या ऑगस्टमध्ये चार हजारांवर पोहोचली आणी कोरोनाचे मीटर थांबता थांबेना. सप्टेंबरअखेर रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्ऱ्पा गाठला आहे. फिजिकल डिस्टन्सचा अभाव, मास्क वापरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क दंडाची तरतूद करूनही नगरपालिकेकडून होत नसलेली अंमलबजावणी, परळीतील कम्युनिटी स्प्रेड या कारणांमुळे बीड जिल्ह्यात कोरोनाने दहा हजारांचा टप्पा पार केला असून जिल्ह्यात दररोज २०० कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळत आहेत.

औरंगाबाद, सोलापूर आणि पुण्याच्या तुलनेत बीडमध्ये मोठ्या रुग्णालयांची संख्याच मुळात कमी असल्याने परळी, अंबाजागाई, केज तालुक्यातील रुग्ण लातूरकडे, बीड, गेवराई वडवणीचे रुग्ण औरंगाबादकडे, तर शिरूर पाटोदा, आष्टीचे रुग्ण नगरकडे धाव घेतात. बीड जिल्ह्याचा कोरोनामुळे मृत्युदर मराठवाड्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत २.७७ एवढा असून आजपर्यंत २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू रोखण्यासाठी आता जे कोरोनाचे रुग्ण गंभीर आहेत त्यांच्यावर वेळेवर उपचार होण्याची खरी गरज आहे. त्यासाठी पुरेसे फिजिशियन, परिचारिका, वेळेवर रक्ताच्या तपासण्यांची गरज आहे. त्याचबरोबर प्रत्येक वॉर्डासाठी २४ तास फिजिशियन देण्याची गरज आहे. जिल्ह्यात क्रिटिकेअरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या अजूनही तक्रारी कायम आहेत.

बीड जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिस्थिती पाहिली तर ती केवळ मनुष्यबळाअभावी गंभीर बनली आहे. दोन दिवसांत भरती झालेला न्यूमोनियाचा रुग्ण केवळ वेळेवर उपचार मिळत नसल्याने गंभीर होतो. सध्या जिल्हा रुग्णालयात न्यूमोनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची देखभाल करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पुरेसे फिजिशियन व परिचारिका नाहीत. एका फिजिशियनकडे पाच वार्ड असून प्रत्येक वार्डातील रुग्णापर्यंत फिजिशियन कसे पोहचणार हा प्रश्न आहे. फिजिशियन रुग्णांच्या केस पेपरवर काय नोट करून ठेवतात, रुग्णाला योग्य उपचार दिले जातात का, याची पडताळणी होत नाही.

मोठ्या वॉर्डात २५ रुग्णांच्या पाठीमागे दिवसभरात चार परिचारिका असते, असे आरोग्य प्रशासन सांगत असले तर एका वॉर्डात एकच परिचारिका दिसून येत आहे. खरे तर न्यूमोनिया व कोरोना संशयित म्हणून दाखल होणाऱ्या रुग्णांचे सरसकट सीटी स्कॅन करण्याची गरज आहे. यातून टक्केवारी समोर येईल. त्याच बरोबर ऑक्सिजन पुरवठ्यावर देखरेख करणारी समिती असली तरी ऑक्सिजन ज्या प्रमाणात लागतो त्या प्रमाणात बाहेरून उपलब्ध होतो का याची तपासणी करण्याची गरज आहे. बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जो नागरिक मास्क लावणार नाही त्याला दंडाची तरतूद केली असली तरी ५० टक्के लोक विना मास्क फिरत असून त्यांच्यावर नगरपालिका कारवाईच करत नाही. त्यामुळे कोरोनाचे वाढते रुग्ण हे मोठे आव्हान आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनासमोर आहे.

डॉक्टर उपस्थित असते तर त्याचे प्राण वाचले असते
बीड जिल्हा रुग्णालयात महिनाभरापूर्वी एक रुग्ण दाखल करण्यात आला होता. परंतु, ड्यूटी असलेले डॉक्टरच उपस्थित नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधूनही ते वॉर्डात आले नाहीत. शेवटी जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉक्टरांना फोन केला. यानंतरही डॉक्टर आले नसल्याने रात्रीच्या वेळी रुग्ण दगावला आणि पहाटेच्या वेळी डॉक्टर पोहोचले. जर डॉक्टर ड्यूटीवर हजर असते तर रुग्णाचे प्राण वाचले असते.

१२ फिजिशियनची गरज
आयसीयूमध्ये ९ रुग्णांच्या पाठीमागे दिवसभर चार परिचारिका असतात. तर, रुग्णालयात ४ वार्डबॉय काम करतात. ७५ रुग्णांच्या पाठीमागे एक एमबीबीएस आणि तीन आयुष व बीडीएस डॉक्टर काम करत आहेत. तर, ७५ रुग्णांच्या मागे एक फिजिशियन आहे. सध्या फिजिशियनची संख्या केवळ चार असून आणखी १२ फिजिशियनची गरज आहे. सध्या खासगी १५ फिजिशियन रोटेशनप्रमाणे काम करत असून पूर्णवेळ फिजिशियन उपलब्ध नाहीत. डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अभाव
बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड व न्यूमोनिया वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियोजन पूर्ण झाले असून सध्या वॉर्डात रुग्ण असल्याने ते लावता येत नाहीत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले आहे.

शाैचालयाची परिस्थिती बकाल
बीड जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील शौचालयाची परिस्थिती बकाल आहे. याचा निश्चितच रुग्णाच्या प्रकृतीवर परिणाम होत असून वारंवार स्वच्छता होतच नाही. यावर शौचालय वापर करणारे लोक पाणी टाकत नाहीत, असे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. कॉमन स्वच्छतागृहाची अवस्था तर बिकटच आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णांचा ऑक्सिजन मास्कही बदलला जात नाही. तो तसाच राहतो, त्यामुळे न्यूमोनियाचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होण्याची शक्यता अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...