आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:बीड शहराजवळ सह्याद्री देवराईला आग; चार एकर परिसरातील झाडे जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराजवळील पालवण येथील डोंगरावर अभिनेता सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून व वन विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या सह्याद्री देवराईमध्ये रविवारी पहाटे आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे ४ एकर परिसरातील झाडे जळाल्याचा अंदाज आहे. वन विभागाने ही आग आटोक्यात आणली. जळालेल्या झाडांमध्ये कडुनिंब, बकूळ, वड अशी विविध प्रकारची झाडे हाेती. शहराजवळील पालवण येथील डोंगरावर अभिनेता सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप यांच्या पुढाकारातून आणि वन विभागाच्या मदतीने चार वर्षांपूर्वी सह्याद्री देवराई विकसित करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर या परिसरात वृक्षलागवड करून संगोपन केले गेले होते. हजारो झाडे या परिसरात लावली गेली होती. त्यामुळे हा परिसर हिरवाईने नटलेला होता. भव्य प्रवेशद्वार आणि परिसरात असलेल्या ओपन जिममुळे सह्याद्री देवराई बीडकरांसाठी पर्यटनस्थळ झाली होती. मोठ्या प्रमाणावर नागरिक इथे व्यायामासाठीही येत असत. रविवारी पहाटे सह्याद्री देवराई डोंगराला भीषण आग लागली. आगीत झाडे जळाली, तर काही झाडांना हानी पोहोचली. वन विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर टँकरद्वारे पाणी टाकून आग आटोक्यात आणली गेली. मात्र, तरीही देवराईचे मोठे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, वन विभागाने अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

अशी दुर्बुद्धी सुचतेच कशी? आग मानवनिर्मित : शिंदे
आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सह्याद्री देवराईचे प्रणेते तथा अभिनेते सयाजी शिंदे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. शिंदे म्हणाले, सह्याद्री देवराईत जगातील पहिले वृक्ष संमेलन घेतले होते. बीडमध्ये आधीच वनाचे क्षेत्र राज्यात सर्वात कमी आहे. अशा वेळी आम्ही देवराई फुलवण्याचा प्रयत्न केला. आग लागणे दुर्दैवी आहे. आग मानवनिर्मित असण्याची शक्यता असून लोकांना अशी दुर्बुद्धी सुचते कशी, असा प्रश्न आहे. कुठेही वनांना आग लागू नये व लागली तर तत्काळ विझविली जावी. कारण झाडांबरोबरच सरपटणारे प्राणी, पक्ष्यांची अंडी, पिल्ले यांचेही नुकसान होते.

पोलिसांनी या घटनेचा शोध लावावा : अरविंद जगताप
देवराईतील आगीची घटना दु:खद असून आग लावणाऱ्याचा पोलिसांनी शोध घ्यायला हवा. आग लावणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. मोठ्या कष्टाने फुलवलेली देवराई बीडकरांचे पर्यटनस्थळ झाली होती. आगीने मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना लेखक अरविंद जगताप यांनी सोशल मीडियातून व्यक्त केल्या.

झाडे नव्हे, गवत जळाल्याचा वन विभागाने केला दावा
याबाबत माहिती देताना वन विभागाचे अधिकारी अमोल मुंडे म्हणाले, एक ते दोन एकर क्षेत्रावर आग लागली होती. यंदा पावसाळा चांगला होता त्यामुळे गवत जास्त प्रमाणात होते. आगीत दोन एकारांवरील गवत जळाले असून झाडे जळाली नाहीत. आग आटोक्यात आणलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...