आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:मासे पकडणे आणि पोहणे मुलांच्या जीवावर बेतले; बीडमध्ये तिघांचा बुडून मृत्यू

गेवराई/अंबाजोगाई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राक्षसभुवन येथील गोदावरी नदीच्या पात्रात युवकाचा शोध घेताना नागरिक. - Divya Marathi
राक्षसभुवन येथील गोदावरी नदीच्या पात्रात युवकाचा शोध घेताना नागरिक.
  • राक्षसभुवनचा युवक, आपेगावातील दोन शाळकरी मुलांचा समावेश

शनिवारी बीड जिल्ह्यात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. मासे पकडण्यासाठी गेलेली आपेगाव (ता. अंबाजोगाई) येथील दोन शाळकरी मुले डोहात बुडाली, तर गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनमध्ये पोहण्यासाठी गोदापात्रात गेलेला तरुण बुडाला.

राक्षसभुवन येथील अविनाश जगदीश नाटकर (१८ ) हा युवक शनिवारी सकाळी राक्षस भुवन येथील शनी महाराज मंदिराजवळ गोदावरी नदीच्या पात्रात आपल्या मित्रांसोबत सकाळी पोहण्यासाठी गेला होता. पोहत तो नदीपात्राच्या दुसऱ्या कडेला गेला मात्र तो परत येताना वेळ लागत असल्याचे पाहून मित्रांनी त्याचा शोध घेतला मात्र तो मिळाला नाही. यानंतर ही माहिती गावकऱ्यांना दिली गेली. गावातील लोकांनीही नदीपात्रात त्याचा शोध घेतला. अखेर, बीड नगर परिषदेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी तहसीलदार सचिन खाडे, तलाठी वाकुडे मंडळाधिकारी यांच्यासह चकलांबा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब झिंजुर्डे आदी दाखल झाले. पाच तासांच्या शोधमोहिमेनंतर गाळात फसलेला त्याचा मृतदेह सापडला.

मासे पकडण्यास गेली होती दोन्ही मुले, पाय घसरल्याने पाण्यात पडले

अंबाजोगाई | मासे पकडण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे शनिवारी (दि.७) दुपारी घडली.

अनिकेत सत्यप्रेम आचार्य (१५) आणि रोहन रमेश गायकवाड ( १५, दोघेही रा. आपेगाव, ता. अंबाजोगाई) अशी त्या दोन मुलांची नावे आहेत. अनिकेत आणि रोहन हे दोघे शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गावाजवळील धानोरा शिवारातील एका पाण्याच्या डोहाकडे गेले होते. मासे पकडत असताना पाय घसरल्याने दोघेही पाण्यात पडले. हे पाहून अनिकेतच्या भावाने धावत येऊन ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. परंतु ग्रामस्थ डोहाजवळ पोहोचेपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी आपेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिले. दरम्यान, दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे आपेगाववर शोककळा पसरली आहे.

एकुलता एक मुलगा गेला

अविनाशचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहशिक्षक म्हणून काम करत असून अविनाशने यंदा इयत्ता १२ वी उत्तीर्ण होत तो शिक्षण औरंगाबाद येथे घेत होता. तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असून त्यास एक बहीण आहे.

बातम्या आणखी आहेत...