आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलनियोजन:मार्च ओलांडल्यानंतरही प्रथमच 58 टक्के साठा शेष, एकही तलाव कोरडा नाही; गतवर्षीच्या दीडपट पावसामुळे यंदा पाणीबाणीतून दिलासा

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरवी फेब्रुवारी महिना ओलांडला की पाणी टंचाईच्या झळा सोसणारा अन‌् टँकरवर अवलंबून असणाऱ्या बीड जिल्ह्याला यंदा पाण्याच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळालेला आहे. मार्च महिना ओलांडलेला असताना प्रथमच जिल्ह्यात ५८.२० टक्के इतका जलसाठा शेष असून विशेष म्हणजे आतापर्यंत एकही प्रकल्प कोरडा पडलेला नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यापुरती तरी पाणीबाणीतून नागरिकांची सुटका झाल्याचे चित्र आहे.

एखाद दुसरे वर्ष वगळले तर सातत्याने अवर्षणाचा सामना करणारा बीड जिल्हा. जिल्ह्यात १२६ लघुप्रकल्प, १६ मध्यम प्रकल्प व २ मोठे जलप्रकल्प आहेत. ६९९.९० मिमी एवढी बीड जिल्ह्याची पर्जन्य सरासरी आहे. परंतु, अनेकदा सरासरीइतका पाऊस होत नसल्याने जिल्ह्याला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. यासह जिल्ह्यातील मांजरा या क्रमांक दोनच्या मोठ्या प्रकल्पांतील पाणी हे लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील इतर गावांसाठीही वापरले जाते.

त्यामुळे अंबाजोगाई, केज, परळी तालुक्यातील गावांना काहीसा ताण सहन करावा लागतो. दरम्यान, गतवर्षी परतीच्या पावसाने जोर लावल्याने सरासरीपेक्षा अधिक पावसाची जिल्ह्यात नोंद झाली. गेल्या पाच वर्षांत विक्रमी म्हणजे १ हजार १०९ मिमी इतका पाऊस गत वर्षभरात नोंद झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जलप्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरले होते. माजलगाव व मांजरा या प्रकल्पातून तर जलविसर्ग करावा लागला होता. डिसेंबर अखेरीस जिल्ह्यातील सर्व जलाशयांत मिळून ९४ टक्के इतका जलसाठा शेष होता.

पुढील तीन महिन्यात म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेला पाणी वापर व बाष्पीभवन यामुळे हा जलसाठा आता ५८ टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत अपवादात्मक स्थितीतील गावांनाच टंचाईचा सामना करावा लागू शकतो. सद्य:स्थितीत उपलब्ध पाणी हे जिल्ह्याला उन्हाळ्यात तर पुरणार आहेच. खरिपालाही आधार ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...