आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात शनिवारी स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. २०१५ मध्ये जिल्ह्यात पहिल्यांदा स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर २०१८ मध्ये रुग्ण आढळले होते. आता शनिवारी पुन्हा दोन रुग्ण आढळले आहेत. यातील एक महिला पाटोदा तालुक्यातील अमळनेर येथील आहे. बीड जिल्हा रुग्णालयाने तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता, तर दुसऱ्या महिलेची तपासणी मुंबईत झाली हाेती. मात्र ती महिला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच थंडी, तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अमळनेर (ता. पाटाेदा) येथील २३ वर्षीय महिलेसह एकूण सात जणांना स्वाइन फ्लूसदृश्य लक्षणे दिसल्याने जिल्हा रुग्णालयाने त्यांचे स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. यातील ६ जणांचा अहवाल हा कोविड पॉझिटिव्ह आला, तर पाटोदा तालुक्यातील अमळनेर येथील महिलेचा अहवाल हा स्वाइन फ्लूबाधित आला आहे. या महिलेला कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नाही. शिवाय तिची प्रकृतीही फारशी गंभीर नाही. तिला होम आयसोलेट केले होते. आज रविवारी या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
दुसरी महिला शनिवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. ती नोकरीनिमित्त मुंबईत असते. तिला थंडी, ताप असा त्रास होऊ लागला होता. तिचा स्वॅब मुंबईतच तपासणीसाठी घेतला होता. त्यानंतर ती बीडमधील घरी आली होती. तिचा अहवालही मुंबईतून पॉझिटिव्ह आल्याची माहिती तिला दिली गेली. त्यानंतर ती बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शहाणे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा रुग्णालयात स्वाइनबाधित व संशयितांसाठी स्वतंत्र वॉर्ड करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्वाइन फ्लू म्हणजे काय आणि काय आहेत लक्षणे?
स्वाइन फ्लू हा श्वसननलिकेत होणारा संसर्ग आहे. इन्फ्लूएन्झा टाइप ‘ए’च्या एच१ एन१ विषाणूंमुळे हा आजार होतो. नाक, डोळे व तोंडावाटे याचा संसर्ग होतो. ताप, थंडी, सर्दी, कफ, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, डायरिया, उलट्या अशा प्रकारची याची लक्षणे आहेत.
आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले
जिल्ह्यात आता दोन रुग्ण स्वाइन फ्लू बाधित आढळून आले आहेत. तर आणखी आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवलेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. मुंबईहून बाधित आलेल्या महिलेवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-डॉ. संतोष शहाणे, प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.