आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्घृण:चार मित्रांनी पोत्यामध्ये कोंबून पेट्रोल टाकत धारूर घाटात पेटवले; तरुणाची मृत्यूशी झुंज, वाढदिवसाचे खोटे कारण सांगत केला प्राणघातक हल्ला

माजलगाव/दिंद्रुड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मान, तोंड भाजले; अंबाजोगाई येथील स्वारातीत उपचार सुरू; वस्तीवरील लोकांनी वाचवले प्राण

वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने तालुक्यातील नाखलगाव येथील १९ वर्षीय तरुणाला त्याच्या चार मित्रांनी घराबाहेर बोलावले व पोत्यात कोंबून पांढऱ्या गाडीत त्याला थेट सोनीमोहा-धारूर घाटात नेले. तेथे निर्घृणपणे दगडाने ठेचून पेट्रोल टाकत ते पोते पेटवून दिले. या घटनेत तरुणाचे तोंड व मान भाजली. जवळील वस्तीवरील लोकांनी त्याला वाचवले. तो सध्या अंबाजोगाईतील स्वराती रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल झाला. क्रूरपणे तरुणावर हल्ला का केला याचे कारण अद्याप उघड झाले नाही.

कृष्णा अर्जुन गायकवाड (१९, रा. नाखलगाव, ता. माजलगाव) याला त्याचा मित्र आदिनाथ सुधाकर गायकवाड (रा. मंगळूर पीर नं. २, ता. माजलगाव) व अन्य तीन अनोळखी तरुणांनी वाढदिवस साजरा करायचा आहे, असे खोटे सांगून २१ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता पांढऱ्या गाडीत एका पोत्यात कोंबून थेट सोनीमोहा ते धारूर रस्त्यावरील घाटात नेले. लाथाबुक्क्याने व दगडाने कृष्णावर वार केले. यात तरुणाचे तोंड व मान भाजली. काही वेळाने चौघेही फरार झाले. भीमराव गायकवाड (४०, रा. नाखलगाव) यांनी तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर करत आहेत.

रात्रभर होता बेशुद्ध अवस्थेत, सकाळी नातेवाईक आले
सोनीमोहा-धारूर घाटात पोत्यात भरून पेटवून दिलेला कृष्णा हा रात्रभर बेशुद्ध अवस्थेत होता. घाटात जहागीरमोहा वस्तीवरील एका कोठ्यावर त्याला आणले. त्यांनतर काही वेळाने कृष्णा शुद्धीवर आला. त्याने लखन जाधव याचा मोबाइल नंबर सांगून घडलेला प्रकार कळवण्यास सांगितले. त्यानुसार लखनला कळवण्यात आले. त्यांनतर २२ रोजी सकाळी ६.१५ सहा वाजता लखनने नाखलगाव येथील कृष्णाचे काका भीमराव गायकवाड यांना माहिती दिली. यावरून भीमराव यांच्यासह तिघे जण कृष्णाला भेटले. त्यानंतर त्याला एका गाडीत बसवून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे नेले. या तरुणाची प्रकृती गंभीर आहे.

काही पुरावे मिळाले
आम्ही घटनास्थळी पंचनामा केला. जेथे घटना घडली तेथून काही पुरावे मिळाले आहेत. या घटनेच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. लवकरच घटनेमागील सत्य समोर येईल. त्या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे. - प्रभा पुंडगे, सहायक पोलिस निरीक्षक, दिंद्रुड.

...तर डॉक्टर, पोलिस जबाबदार
घटनेनंतर स्वाराती रुग्णालयात कृष्णाचा जबाब घेण्यासाठी धारूरचे पोलिस आले होते. पण तो जबाब देऊ शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. पण कृष्णा तेव्हा बोलत होता. काही बरे-वाईट झाल्यास डॉक्टर व पोलिस जबाबदार असतील. - भीमराव गायकवाड, कृष्णाचे काका.

इनसाइड स्टोरी - विव्हळत म्हणाला, मामा... तुमचा फोन देता का?
बुधवारी रात्रीचे १२ वाजले होते. कृष्णा चालत धारूर तालुक्यातील भायजळी गावाजवळील ५० फूट अंतरावरील एका हनुमान मंदिरात आला. नंतर पहाटे पाचला आमच्या घरासमोर पायरीवर बसून होता. त्याने माझे वडील विक्रम गायकवाड यांना मामा म्हणत कॉल करण्याची विनवणी केली. रात्र हनुमान मंदिरात काढली आता घरच्यांना बोलायचे असल्याचे त्याने म्हटले. त्याच्या अंगावर सिमेंटचे पोते होते. मी त्याला शर्ट दिला व नंतर नातेवाइकांना कळवले. १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. पण धारूरची रुग्णवाहिका बंद असल्याने ती मिळाली नाही. दुचाकीवरही नेता आले नाही. एक तासाने कृष्णाचा मेहुणा व काका आले. (कृष्णाला मदत करणारे भायजळीतील अविनाश गायकवाड यांनी “दिव्य मराठी’ला माहिती दिली.)

बातम्या आणखी आहेत...