आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांची मूर्ती:विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक चारशे गणेशमूर्तींची होणार प्रतिष्ठापना

टीम दिव्य मराठी | बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक घरी, मातीचे गणपती’ या दैनिक दिव्य मराठीच्या अभियानाला प्रतिसाद देत माजलगाव शहरातील फ्लाईंग बर्ड्स अकॅडमी या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाडुच्या मातीपासून लाडक्या बाप्पांची मूर्ती घडवली. शाळेतील ४०० विद्यार्थ्यांनी या पर्यावरणस्नेही अभियानात सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून राजेगावच्या सरपंच रुपाली शरद कचरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर , ‘दिव्य मराठी’चे तालुका प्रतिनिधी दिलीप झगडे, पत्रकार गोविंद करवा उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर म्हणाले, पर्यावरणाच्या दृष्टीने मातीच्या गणेश मूर्ती या अतिशय उपयुक्त आहेत. या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर पर्यावरणाला कुठलीही हानी पोचत नाही. गणराय हा बुध्दीचा, सकल कलांचा अधिपती आहे. त्यामुळे चिमुकल्यांनी आपल्यातील कलेचा वापर करत मुर्ती घडवली, ही अतिशय आनंदाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना सरपंच रूपाली कचरे म्हणाल्या, शिक्षणाला महत्व आहेचं. परंतु आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असणार आहेत म्हणून प्रत्येक शाळेत शालेय शिक्षणाबरोबरच बालमनावर चांगले संस्कार होणे गरजेचे आहेत. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवण्याचा हा उपक्रम सामाजिक भान जपणारा आहे. असे उपक्रम विद्यार्थ्यांना घडवतात, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, फ्लाईंग बर्ड्स अकॅडमीत झालेल्या या कार्यशाळेत जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत चिमुकल्या हातांनी मातीच्या सुबक मूर्तींना घडवल्या. या सर्व विद्यार्थ्यांना शिल्पकार निखिल मुळी, सारंगधर धर्माधिकारी व शाळातील शिक्षक शिक्षिका यांनी प्रशिक्षण दिले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग चांडक, संचालक प्रभाकर शेटे, अनिल दळवी, कैलास शर्मा, जगदीश चांडक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता बियाणी, भुतडा, थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी पोतदार व स्वामी यांनी केले.

धारूरला लोकोपयोगी उपक्रम राबवत उत्सव साजरा होणार धारूर येथील प्रमुख गणेश मंडळापैकी एक असलेल्या व मागील ५७ वर्षांची परंपरा असलेल्या जय किसान गणेश मंडळाच्या वतीने यंदाही गणेशोत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यावर्षी मंडळाच्या वतीने पर्यावरण पूरक पद्धतीने गणेशाची स्थापना होणार आहे. यामध्ये सहा फूट उंच आणि विस्तीर्ण वडाच्या झाडाला गणपतीचा देखावा बसवत गणेश स्थापना होणार आहे.

यावर्षी या गणेशोत्सवामध्ये जय किसान गणेश मंडळाकडून एक ते सात सप्टेंबरर्यंत आशिष महाराज यांच्या शिव कथेचे आयोजन करण्यात आले आहे.दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर, तिसऱ्या दिवशी शहरात जनजागरण रॅली व सामाजिक सलोख्याचा देखावा, चौथ्या दिवशी शहरातील असणाऱ्या स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण व त्या लागवड केलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी, पाचव्या दिवशी अवयव दान महाआरोग्य शिबिर, सहाव्या दिवशी पशुधन आरोग्य शिबिर, सातव्या दिवशी किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक समस्या उपाय मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिन वाटप आणि पथनाट्य,आठव्या दिवशी अशोक महाराज शिरसाट यांचे कीर्तन व पारंपारिक खेळांच्या स्पर्धा तर नवव्या दिवशी नऊ सप्टेंबर रोजी गणेशाची मिरवणूक काढून विसर्जन अशा पद्धतीने आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाने जय किसान गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
बीड येथे विवेकवाहिनी, महिला कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरातील शाळांमधून “ पर्यावरणपूक गणेशोत्सव” या विषयावर प्राचार्य डॉ.सविता शेटे यांनी जनजागृ़ती केली. संस्कृती विद्यालय येथील व्याख्यानात शाडूची, धातूची, कागदाची मूर्ती निवडण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग टाळावा, असे आवाहन याप्रसंगी प्राचार्या सविता शेटे यांनी विद्यार्थ्यांना केले.

स्वा.सावरकर विद्यालयात ३० विद्यार्थ्यांचा सहभाग
स्वा. सावरकर माध्यमिक विद्यालय, बीड येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविणे कार्यशाळा घेण्यात आली. अंजली खोबरे यांनी विद्यार्थ्यांना गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी ३० मूर्ती घडवल्या. यावेळी शालेय समिती अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, संस्था शिक्षक प्रतिनिधी तथा विद्यासभा उपाध्यक्ष उमेशजी जगताप मुख्याध्यापक संजय विभूते, पर्यवेक्षक विठ्ठल काळे, कला शिक्षक सुरेश चव्हाण आदींसह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...