आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकार:तीन वर्गांत चार विद्यार्थी, दोनच शिक्षक; धारूर तालुक्यातील प्रकार

संदिपान तोंडे | धारूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्गखोल्या तीन, शिक्षक दोन व विद्यार्थी केवळ चार अशी केविलवाणी अवस्था बनली आहे ती धारूर तालुक्यातील भायजळी येथील मुंडे वस्ती क्रमांक दोन शाळेची. मंगळवारी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने भेट दिली असता शिक्षकही दुपारच्या वेळी शाळेत वामकुक्षी घेताना आढळले. दरम्यान, केंद्रप्रमुखांमार्फत परिस्थितीची माहिती घेऊन अहवाल वरिष्ठांना पाठवणार असल्याचे धारूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तालुक्यातील गोपाळपूरअंतर्गत भाईजळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडे वस्ती क्रमांक दोनच्या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असली तरी इथे वर्गखोल्या तीन आणि शिक्षक दोन आहेत. मंगळवारी दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने या शाळेला भेट दिली असता या शाळेत चारच विद्यार्थी दिसून आले. शिक्षक भोसले पाय दुखत असल्याचे कारण सांगून वर्गात झोपलेले होते. पहिलीच्या वर्गात २ विद्यार्थी, दुसरीला १ विद्यार्थी, तिसरीला २, चौथीला २, तर पाचवीला ५ विद्यार्थी संख्या पटावर आहेत.

येथील दोन विद्यार्थी आपल्या पालकांबरोबर ऊस तोडणीला गेले आहेत. शाळेपासून अवघ्या अर्धा किमी अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडे वस्ती -१ असून येथे शिक्षक दोन, विद्यार्थी संख्या १३ आहे. दोन्ही शाळांची परिस्थिती पाहिली तर एकूण विद्यार्थी संख्या पटावरील जरी पाहिली तरीही २० च्या जवळपास होते. अशा ठिकाणी जवळ जवळ शाळा असूनही विद्यार्थी संख्या कमी असताना चार शिक्षकांची आवश्यकता नाही. शासनाचे चुकीचे धाेरण इथे उघडे पडत आहे. तालुक्यात ज्या शाळेवर विद्यार्थी संख्या अधिक आहे अशा ठिकाणी या शाळेवरील शिक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे.

चांगल्या शाळेत जावे वाटते
भायजळी येथील मुंडे वस्ती शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पालकांचा सहभाग दिसून येत नाही. विद्यार्थी हजर राहत नाहीत. दोन विद्यार्थी स्थलांतरित झाले आहेत. मंगळवारी तर तीन विद्यार्थी घरी गेले होते. मला चांगल्या शाळेवर काम करावेसे वाटते. - बिभीषण भोसले, शिक्षक.

अहवाल पाठवणार
कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ठिकाणी दोन शिक्षकांची गरज नाही. ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी आहे तेथील शिक्षकांची बदली करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. याबाबत वरिष्ठांनी निर्णय घेण्याची गरज आहे. केंद्रप्रमुखांमार्फत माहिती मागवून अहवाल वरिष्ठांना पाठवणार आहे.- गणेश गिरी, गटशिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...