आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिर:संगमेश्वर मंदिरासाठी निधी द्या; अन्यथा आम्हाला परवानगी द्या

पाटोदा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा शहरातील संगमेश्वर मंदिराचे शिखर कोसळून २ वर्षे होताहेत तरीही मंदिर पुनर्निर्माणाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याविषयी दिव्य मराठीने सातत्याने वृत्तमालिकेतून पाठपुरावा केला. याच पार्श्वभूमीवर पहिल्या श्रावण सोमवारी (१ ऑगस्ट) पाटोदा येथे संत-महंतांसह भाविकांनी घंटानाद आंदोलन केले. या ‘मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी निधी उपलब्ध करा, अन्यथा आम्हाला तरी मंदिर उभारण्याची परवानगी द्या, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. पुरातत्त्व विभागाच्या वतीने अधिकारी अमोल गोटे यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी लवकरच निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

भाविकांचे श्रद्धास्थान व पाटोदा शहराच्या वैभवात भर घालणारे पुरातन तेराव्या शतकातील हे संगमेश्वर महादेवाचे मंदिर गेल्या दीड वर्षापूर्वी पावसाळ्यात कोसळले होते. पुरातत्त्व विभागाकडून संरक्षित केलेले ही वास्तू अनपेक्षितरीत्या ढासळली होती. हे शिखर कोसळण्यापूर्वी काही दिवसच दीड कोटी रुपये खर्च करून पुरातत्त्व विभागाकडून याची डागडुजी केली होती. त्यामुळे नागरिकांत मोठा संताप होता.

पहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून केलेल्या या आंदोलनात टाळ-मृदंगासह भाविक सहभागी झाले होते. या वेळी रंजित महाराज जाधव, रामकृष्ण रंधवे बापू महाराज यांनी संगमेश्वर मंदिर हे पाटोदेकरांचे श्रद्धेचे स्थान असून या मंदिराचे तातडीने पुनर्निर्माण व्हावे, अशी मागणी केली. या आंदोलनात उद्धव देवा पांडव, माजी सभापती राजू जाधव, अॅड. तात्यासाहेब तवार, पत्रकार महेश बेदरे, राहुल जाधव, विजय जाधव, सुहास जाधव, विकास जाधव, चक्रपाणी जाधव, स्वामी सानप, लक्ष्मण सस्ते, विजय डोरले, शंकर पांडव, बाळासाहेब दळवी, जय जाधव, किरण आवडाळ, चंद्रकांत बोबडे, गणेश शेवाळे आदी सहभागी हाेते. या वेळी संगमेश्वर मंदिर संदर्भात पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी अमोल गोटे यांना मागणीचे निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...