आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​गणेशोत्सव:दीड हजार मंडळे बसवणार गणपती; 2 हजार उपद्रवींवर होणार कारवाई

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. पोलिस प्रशासनाकडूनही गणेशोत्सवाची तयारी केली जात आहे. जिल्ह्यात सुमारे दीड हजार मंडळांकडून गणेश स्थापना होणार आहे. हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी २ हजार उपद्रवी लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार आहे.

कोरोनाच्या २ वर्षांच्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध होते. मात्र, यंदा निर्बंधांविना गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशमूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्यात. पोलिस प्रशासनाकडूनही हा गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी तयारी सुरू झाली. एसपी नंदकुमार ठाकूर, एएसपी सुनील लांजेवार, अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणे प्रमुख आपापल्या हद्दीत शांतता समितीच्या बैठका घेताहेत. जिल्ह्यात २०१९ मध्ये १४९८ गणेश मंडळांनी गणेश स्थापना केली होती. यंदा हा आकडा इतकाच राहण्याचा अंदाज आहे. यंदा मंडळांना ऑनलाइन परवाना घ्यावा लागणार असून प्रत्येक पोलिस ठाण्यात व्यवस्था केली आहे. जुन्या मंडळांना तत्काळ परवाने दिले जात असून नव्या मंडळांची तपासणी करून परवानगी दिली जात आहे.

६१ जण होणार तडीपार
गणेश विसर्जनाच्या वेळी काही जणांवर तात्पुरत्या स्वरूपात तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ६१ जणांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित केली आहे. विसर्जनाच्या एक किंवा दोन दिवसांसाठी त्यांना पोलिस ठाणे हद्दीतून किंवा तालुक्यातून तडीपार केले जाणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने केल्यात सूचना
गणेश मंडळांना सुरक्षेच्या दृष्टीने सूचना देण्यात येत आहेत. मोठ्या मंडळांनी सीसीटीव्ही लावावेत, २४ तास दोन स्वयंसेवक उपस्थित असावेत, महिलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, चाेरून वीज वापरू नये, ध्वनी प्रदूषण करू नये अशा सूचना दिल्यात.

जिल्ह्यात गणेशोत्सवात मागील पाच वर्षांत ८ गुन्हे, ९ संवेदनशील ठिकाणे जिल्ह्यात गणेशोत्सवात मागील पाच वर्षांत ८ गुन्हे नोंद झालेत. यात २ गुन्हे विनापरवानगी गणेश स्थापना केल्याचे आहेत. ४ गुन्हे विसर्जन मिरवणुकीतील अंतर्गत वादाचे, १ गुन्हा मूर्ती विटंबनेचा, तर १ गुन्हा जबरदस्तीने वर्गणीबाबत दाखल आहे. जिल्ह्यात एकूण ९ संवेदनशील ठिकाणे आहेत.

मंडळांसाठी दिले जाणार पुरस्कार
चांगले काम करणाऱ्या मंडळांसाठी पोलिस ठाणे स्तरावरून गणराय अवॉर्ड देणार आहे. प्रत्येक ठाणे हद्दीतील दोन मंडळांना पुरस्कार दिले जातील. मंडळाची शिस्त, व्यवस्था, प्रबाेधन, उपक्रम, विसर्जन मिरवणुकीतील शिस्त यावर परीक्षक मंडळ नेमून हे पुरस्कार दिले जातील.

बातम्या आणखी आहेत...