आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्र घडविण्यात महात्मा गांधीचा वाटा मोठा होता. महात्मा गांधींच्या प्रेरणेने भारत देश आजही संपूर्ण जगभरासाठी आदर्श देणारा ठरलेला आहे. गांधी हे फक्त नाव नसून ते एक तत्वज्ञान आहे, तो एक विचार आहे. कितीही काळ गेला तरी हा विचार अजरामर राहणार आहे, असे प्रतिपादन गांधी फाउंडेशनचे समन्वयक संकेत मुनोत यांनी केले. जिजामाता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था धानोरा (बु) आयोजित राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनात ''गांधी ते गांधी'' हा परिसंवाद संपन्न झाला.
या परिसंवादात गांधी फाउंडेशनचे समन्वयक संकेत मुनोत, अॅड.गणेश कारंडे, डॉ जयप्रकाश आघाव हे सहभागी झाले होते. गांधी समजून घेण्यासाठी गांधीच्या आधीचा भारत व गांधी आल्यानंतरचा भारत यांच्या अभ्यास करावा लागेल. गांधींच्या आधीचा भारत हा सर्वसामान्यांसाठी नव्हता तर मूठभर संस्थांनिकासाठी होता. गांधी आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य हे उच्चवर्णीयांसाठी नसून सर्वसामान्यांसाठी असेल हे जाहीर केल्यानंतर सर्वसामान्य जनता स्वातंत्र्य लढ्यात सामील झाली. त्यामुळे हा लढा यशस्वी झाला. राष्ट्र घडविण्यात गांधीचा वाटा मोठा होता. भारत देशाच्या स्वातंत्र्याचा लढा खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या हिताचा होता.
महात्मा गांधी यांनी हीच भूमिका देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली. गांधीचे तत्वज्ञान जगाला दिशा देणारे आहे, असेही गांधी फाउंडेशनचे समन्वयक संकेत मुनोत यांनी सांगितले. गांधी सर्वांसोबत असून गांधी शिवाय माणूस जगू शकणार नाही. खेड्याकडे चला ही संकल्पना गांधीजींनी आणली आणि आजचे सरकार स्मार्ट सिटीच्या मागे आहे. त्यामुळे आपण विचार करण्याची गरज आहे. ग्रामीण भाग आज ओस पडताना दिसत आहे. ज्येष्ठांकडे बघायला कोणाला वेळ नाही. गावपणं हरवतं चालले आहे. त्यामुळे विकास कितीही झाला तरी शाश्वतता महत्वाची आहे, असेही अॅड. गणेश करांडे यांनी सांगितले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन बालाजी शेरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत वडमारे यांनी मानले. यावेळी नागरिकांची हजेरी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.