आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारूर पालिकेचे दुर्लक्ष:डेपोतील कचरा उडून येतोय धारूर येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर; साफसफाईची मागणी

धारूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर येथील न्यायालयाची सुसज्ज अशी इमारत आहे. परंतु, नगर परिषदेच्या वतीने या इमारतीसमोर घनकचरा व्यवस्थापन डेपो करण्यात आलेला आहे. वाऱ्यामुळे हा कचरा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच उडून येत असून न्यायालय परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना याचा मोठा त्रास होत असून या बाबीकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असून आता सामाजिक कार्यकर्त्यांनीच हा मुद्दा हातात घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

धारूर शहराच्या पश्चिमेस भव्य अशी न्यायालयाची इमारत आहे. या इमारतीपासून अवघ्या शंभर फूट अंतरावर धारूर शहरातील कचरा व्यवस्थापन डेपो आहे. शहरातून जमा करण्यात येणारा कचरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टाकण्यात येत आहे. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा समावेश आहे. सदरील प्लास्टिक पिशव्या वाऱ्याने उडून न्यायालयाच्या इमारतीकडे जात आहेत. वाऱ्याने उडालेल्या पिशव्या या न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर उडून खच साचला आहे.

यामुळे तसेच काही पिशव्या न्यायालय परिसरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना अडकलेल्या आहे. त्यामुळे या परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे. तरी पालिकेने या कचऱ्याकडे तत्काळ लक्ष देऊन या परिसराची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी निर्धार सामाजिक संस्थेच्या सचिव सत्यभामा सौदरमल यांनी धारूर पालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन केली आहे. या निवेदनामध्ये तत्काळ प्लास्टिक कचऱ्याची साफसफाई करण्यासह नागरी आरोग्य अशा विषयांमुळे धोक्यात येत असल्याने याविषयी ठोस अशी कार्यवाही करत कचऱ्याचे कायमचे व सुनियोजित व्यवस्थापन करण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली.

पालिकेने तत्काळ लक्ष देण्याची गरज
न्यायालयाच्या परिसरात प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात वाऱ्याने उडून आलेला आहे. यामुळे येथे दुर्गंधी पसरलेली असून प्रदूषण वाढतेय. न्यायालयाच्या गेटवर मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला आहे. ही बाब योग्य वाटत नाही. पालिकेने तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे.
- सत्यभामा सौंदरमल, सचिव, निर्धार सामाजिक संस्था.

अभ्यागतांना मोठा त्रास
तालुक्यात विविध विधी प्रकरणांच्या निमित्ताने न्यायालयाच्या आवारात येणाऱ्या अभ्यागतांना, नागरिकांना तसेच वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना या अस्वच्छतेचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे सुसज्ज इमारत असूनही या असुविधेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेने तत्काळ स्वच्छता राबवावी.

बातम्या आणखी आहेत...