आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गेवराई-उमापूर-शेवगाव रस्ता २ महिन्यांतच उखडला; वाहनधारकांना करावी लागतेय कसरत

गेवराई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई-उमापूर-शेवगाव डांबरी रस्ता अवघ्या दोनच महिन्यांत उखडला असून अनेक ठिकाणी खड्डे पडलेत. दरम्यान, अवघ्या दोन महिन्यांतच रस्ता उखडल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

गेवराई शहरातून उमापूरकडे जाणाऱ्या जालना फाटा ते उमापूरपर्यंतचा रस्त्याची कित्येक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणाहून गेवराईमार्गे उमापूर, शेवगाव, नगर, शिर्डी, पुणे, मुंबईकडे जाता-येता येते. हजारो वाहने या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र, या रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे. या रस्त्यासाठी आमदार पवारांनी निधी उपलब्ध केला होता. परंतु भाजप-सेनेचे सरकार गेले आणि २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. दुर्दैवाने त्या सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात या रस्तेकामाला सुरुवात झाली नाही. आमदार पवार यांनी संबंधित ठेकेदाराला अनेकदा सूचना केली. सरकारकडे पाठपुरावाही केला. मात्र, गुत्तेदाराने रोज नवी कारणे दिली. रस्त्यावर टाकलेल्या खडीवर झाडे उगवली तरीही त्याने रस्ता केलाच नाही. अखेरीस गुत्तेदाराने मुहूर्त साधून दोनच महिन्यांत काम उरकून घेतले. मनमानी कारभार केला. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत रस्ता उखडायला सुरुवात झाली. ३५ ठिकाणी या नव्या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत. ओबडधोबड रस्ता करून उमापूरकरांच्या नशिबी पुन्हा खड्ड्यांचा रस्ता येण्याची चिन्हे आहेत. यंदाच्या पावसातच गेवराई-उमापूर-शेवगाव डांबरी रस्ता पूर्णपणे खराब झाल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यानंतर होणार काम
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ते शेवगाव असा रस्ता असून गेवराई तालुक्यातील हद्द असलेल्या महार टाकळी रस्ता सन २०१७ मध्ये एका ठेकेदाराला दिला होता. काम वेळेवर झाले नसल्याने संबंधित ठेकेदाराला दंड केला. सध्याच्या परिस्थितीत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पाणी जेसीबीच्या माध्यमातून काढणे सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे काम करण्यात येईल, असे डेप्युटी इंजिनिअर जे. एन. भोरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...