आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसिंचन:मध्य गोदावरी उपखोऱ्याचे पाणी गेवराईला मिळणार; मंत्री जयंत पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

बीड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य गोदावरी उपखोऱ्यातील पाणी वापराच्या बृहत आराखड्यात गेवराई तालुक्यातील ११ प्रकल्पांचा समावेश करावा यासाठी माजी आ. अमरसिंह पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी गेवराई तालुक्याचा समावेश बृहत आराखड्यात करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे, मध्य गोदावरी उपखोऱ्यातील पाणी गेवराई मतदार संघाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही गेवराई तालुक्याला सिंचनासाठी अधिकचे पाणी उपलब्ध करण्यासाठी आग्रह धरला.

मध्य गोदावरी नदीच्या उपखोर्‍यातील हक्काचे पाणी गेवराई विधानसभा मतदारसंघाला मिळावे म्हणून सातत्याने अमरसिंह पंडित यांनी वेळोवेळी आवाज उठविला. तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात लवादाकडून पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून लवादाकडून १९.२८ टीएमसी पाणी मध्य गोदावरी नदीच्या उपखोऱ्यात उपलब्ध झाले, मात्र काही जाचक अटीमुळे गेवराई तालुका या पाणी वापरापासून वंचित राहत होता. त्यामुळे माजी आ.अमरसिंह पंडित यांनी हक्काचे पाणी मिळावे यासाठी या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी शासनाकडे केली होती. ४ मे राजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या बाबत सविस्तर चर्चा झाली.

बैठकीला अमरसिंह पंडित यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.संजय दौंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर चव्हाण उपस्थित होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह धरला.या नव्या कालव्याने यापूर्वीचे सर्व प्रकल्प व जुन्या सिंचन योजनांत पाणी सोडणे शक्य होणार आहे. मंत्री जयंत पाटील याप्रकरणी अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देवून पाणी वापराच्या बृहत आराखड्यात गेवराईचा समावेश करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे मध्य गोदावरीच्या उपखोऱ्यातील पाणी गेवराई विधानसभा मतदार संघाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भौगोलिक उंचवट्याचा वापर करून नवे कालवे करा
मारफळा, वाघदरा, अर्धमसला, तांदळा, भाटेपुरी, जातेगाव, सिरसदेवी, पौळाचीवाडी, चकलांबा, पाचेगाव व माटेगाव या अकरा ठिकाणी साठवण तलाव मंजूर करावेत, गोदावरी नदीपात्रातील पाणी बंद नलिकेद्वारे सिंदफणा नदीपात्रात सोडून सिंदफणा आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यांच्या मधोमध भौगोलिक उंचवट्याचा योग्य वापर करून नवीन कालवा प्रस्तावित करण्याची मागणीही माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...