आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानऊशे वर्षांपूर्वी ज्या उद्देशाने वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली तो उद्देश आता मात्र बाजूला राहून त्याची जागा दांभिकता, कर्मकांड आणि पाखंडाने घेतलेली आहे; म्हणून समाजातील जागरूक व्यक्तींनी पुढाकार घेऊन अशा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करणे हा एक क्रांतिकारक उपक्रम आहे. संत नामदेवापासून, बसवेश्वर, चक्रधर ते संत तुकाराम पर्यंत सर्व संतांच्या वचनांचे प्रमाण देऊन आपल्या कर्तव्याला प्राथमिकता देणे हा विचार महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन कवि इंद्रजीत भालेराव यांनी केले. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त कान्नापूर (ता.धारुर) येथे शुक्रवारपासून (ता.३ मार्च) कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील चौदा गावांनी मिळून या शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या कीर्तन महोत्सवाची सुरवात कवी भालेराव, उद्धवबापू आपेगावकर यांच्या उपस्थितीत झाली. पुढे बोलताना कवी भालेराव म्हणाले, ९०० वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली ती जनप्रबोधन व समाजाला दिशा देण्यासाठी. मात्र अलीकडच्या काळात आपण अनेक लोक संप्रदायाला बदनाम करत असल्याचे पाहतो. दांभिकता, कर्मकांड आणि पाखंडी वृत्ती असलेल्यांनी शिरकाव केलेला आहे. समाजातील जागरूक व्यक्तींनी वेळीच पुढाकार घ्यायला हवा. वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थाने समतेची शिकवण देणारा आहे. त्यामुळे या संप्रदायाचा मुळ विचार आपणा साऱ्यांनी विसरू नये, असेही भालेराव यांनी सांगितले. सध्याच्या पोटभरू परमार्थाबद्दल उद्धव बापू आपेगावकर यांनी शेलक्या शब्दात परखड प्रहार केले.
त्याचवेळी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचा शेतकरी पुत्रांनीच मोलभाव करू नये. तो योग्य किंमतीत खरेदी करावा जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या कामाचं योग्य मोल मिळेल, असा विचार गोविंद शेळके यांनी मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्यामसुंदर महाराज सौन्नर यांनी केले. १४ गावच्या संयोजन समितीने पुढाकार घेऊन हा कीर्तन महोत्सव सुरू केलेला आहे. त्यावेळी पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक व महिला उपस्थित होत्या.
नऊ मार्च पर्यंत हा कीर्तन महोत्सव चालणार असून असेच उद्बोधक कार्यक्रम कीर्तन सुरू राहणार आहेत. याचा परिसरातील शेतकऱ्यांनी, आबालवृद्ध महीला,तरुण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुल लाभ घ्यावा अशी आवाहन समन्वय समितीचे ॲड.अजय बुरांडे यांनी केले. दरम्यान, शेतकरी कीर्तन महोत्सवास पहिल्या दिवशी कीर्तनास मोठी हजेरी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.