आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी:थेट घोड्यावर हैदराबादला जाऊन आणली गणपती स्थापनेची परवानगी

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परवानगी नसल्याचे कारण पुढे करत १९०१ मध्ये माजलगावात तत्कालीन निजामाने ढुंढीराज टेंबे गणपतीची स्थापना मिरवणूक अडवली होती. तेव्हा गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घोड्यावर हैदराबादला जाऊन निजामाकडून ताम्रपटावर स्थापना परवानगी आणली होती. परवानगी आणण्यासाठी तब्बल पाच दिवसांचा उशीर लागल्याने माजलगावात पाच दिवस उशिराने ढुंढीराज टेंबे गणपतीची प्रतिष्ठापना होते. मंगळवार ६ सप्टेंबर रोजी दुपारी मिरवणूक काढून सायंकाळी सात वाजता मंत्रघोषात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

निजामकालीन राजवटीत १९०१ मध्ये माजलगावात टेंबे गणपतीची स्थापना करण्यात आली होती. आजतागायत या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मानाचे टेंबे मिरवले जातात. शहरात या मंडळाला मोठा ऐतिहासिक वारसा असून १२२ वर्षांची परंपरा आहे. ६ सप्टेंबरपासून ११ सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी ११ सप्टेंबरला भाद्रपद प्रतिपदेस या गणपतीचे विसर्जन होणार आहे.

मिरवणुकीत मानाचे टेंबे १९०१ मध्ये विजेची व्यवस्था नव्हती. विसर्जन मिरवणुकीत प्रकाश असावा म्हणून लाकडाला कापड गुंडाळून त्यावर तेल टाकून टेंबे तयार करून असे टेंबे मिरवणुकीत धरले जात होते. त्यांनतर नवसपूर्ती, वंशवृद्धीसाठी अनेक गणेशभक्त टेंबे लावून या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत श्रद्धेने सहभागी होतात.

वही, पेन अर्पण करावा
यंदा गणपतीच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांनी पेन आणि वही गणपती चरणी अर्पण करावी, हे शैक्षणिक साहित्य समाजातील वंचित, उपेक्षित घटकांतील गरजू मुलांना वाटप केले जाणार आहे. - अनंतदेवा जोशी, अध्यक्ष, ढुंढीराज टेंबे गणपती

बातम्या आणखी आहेत...