आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सातवीतली सई गायके तिच्या मैत्रिणीला आजचा गृहपाठ केला का हे जपानीतून विचारते तर, माझा गृहपाठ केव्हाच झालाय, आता मी रोबोटिक्सची प्रोग्रामिंग करतेय असे तिची मैत्रीण तिला त्याच भाषेत सांगते. आठवीतला ज्ञानराज गांडुळे मित्रांसोबत विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवणारे अॅप तयार करताेय हे दृश्य आहे गौंडगाव (ता. गेवराई) जिल्हा परिषद शाळेतील! लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असताना गौंडगावच्या विद्यार्थ्यांनी आधी कोंडिंग आणि नंतर जपानी भाषा शिकली आहे.
उपशिक्षणाधिकारी प्रवीण काळम म्हणाले, वर्षभरापूर्वी आम्ही पुणे जिल्ह्यातल्या वाबळेवाडी या आंतरराष्ट्रीय शाळेला भेट देण्यासाठी तालुक्यातील काही गावांतील पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणप्रेमी यांना घेऊन गेलो होतो. यानंतर गौंडगावच्या पालकांना, मुलांना शिक्षकांनी आपण वेगवेगळे प्रयोग करावेत, असे वाटले. याच दरम्यान वाबळेवाडीचे तरुण अभियंता अनुप यादव, मुंबईचा श्रेयस मिस्त्री, चंद्रपूरच्या हेमाश्री यांच्याशी संपर्क आला. फेब्रुवारीमध्ये तिघेही गौंडगावात आले. तीनच िदवसांत विद्यार्थ्यांशी त्यांची गट्टी जमली. त्यांनी विद्यार्थ्यांना कोडिंग, प्रोग्रामिंग याबाबतची प्राथमिक माहिती दिली. मार्चमध्ये लॉकडाऊन झाले, शाळा बंद झाली पण ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून तिघांनीही विद्यार्थ्यांना रोबाेटिक्स, कोडिंग शिकवले.
तयार केले विविध अॅप
विद्यार्थ्यांनी कोडिंग, रोबाेटिक्स, प्रोग्रामिंग या विषयातही प्रगती केली. कॅलक्युलेटर अॅप, विद्यार्थ्यांची हजेरी अॅप, काही प्रोग्राम तयार केले. शिवाय मुले उत्तम प्रकारे इंग्रजीही बाेलू लागली. यासाठी गावातील तरुणांनी आधी स्वत: शिकून मग विद्यार्थ्यांना धडे दिले.
...अन् जपानी भाषा शिकण्यास सुरुवात
शिक्षक जगन्नाथ जाधव म्हणाले, संकेत पुरी गौंडगावचे रहिवासी, व्यवसायाने अभियंता, जपानमध्ये असतात. लॉकडाऊनमध्ये त्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू असताना त्यांनीही विद्यार्थ्यांना जापानी भाषेचे धडे दिले. सहावी ते आठवीतल्या ७८ विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना याची गोडी लागली. विद्यार्थ्यांनी इंटरनेटवर शोधून नंतर जापानी भाषेतील शब्दांचे अर्थ, उच्चार याचा सराव केला. संकेत पुरीही त्यांना शिकवत होतेच यातून २२ मुले चांगल्या प्रकारे जापानी बोलू लागले आहेत.
शिक्षण सचिवांकडून दखल
काेजागिरी पौर्णिमेला बालकट्टा या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण विभागाने केले होते. यात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी यात कलागुण सादर केले. राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. हा उपक्रम राबवण्यासाठी मुख्याध्यापक शिवराम पवार, शिक्षक संतोष गर्कळ, जे. एन. जाधव, एस. बी. येडे, संतोष पवार यांच्यासह संकेत पुरी, रूपेश सोलाट आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.