आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे आपल्या सर्वांवर चांगले संस्कार आहेत. आपल्या एकजुटीच्या शक्तीतूनच कोणत्याही प्रसंगाला आपण खंबीरपणे सामोरे जातो. आपल्या कार्यक्रमांचे नेहमी विराट शक्तिप्रदर्शन, घोषणा, टाळ्या शिट्ट्या असे चित्र असते. तथापि आपल्या एकजुटीची ताकद किती संयमी आहे याचा अनोखा प्रघात आजच्या आपल्या अर्ध्या तासाच्या मौनाने जगासमोर सिद्ध करून दाखवला आहे, असे सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सत्य, स्वाभिमान व वंचितांच्या सेवेचा घेतलेला वसा शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही, अशी ग्वाही आज गोपीनाथगडावरून दिली. महापुरुष हे आपल्यासाठी आदर्शच आहेत, त्यांच्याबद्दल वाईट, चुकीचे बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही, असेही त्या म्हणाल्या.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची गोपीनाथगडावर अनोख्या पद्धतीने एकजूट दिसून आली. गोपीनाथगड आपापल्या गावी घेऊन जावा व राज्यातील अप्रिय घटनांबद्दल अर्ध्या तासाचे मौन पाळावे, असे आवाहन पंकजांनी केले होते. त्याला राज्यात सर्वत्र प्रतिसाद मिळाला. कार्यकर्ते व नागरिकांनी आपापल्या गावी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत अर्ध्या तासाचे मौन पाळले.
प्रारंभी सकाळी गोपीनाथगडावर पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रीतम मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, गौरव खाडे तसेच कुटुंबातील सदस्यांनी मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल पंकजांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसह अर्धा तास मौन पाळले. त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले.
लोकनेत्यास अभिवादन मान्यवरांची उपस्थिती
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. रत्नाकर गुट्टे, आ. मोनिका राजळे, आ. सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, आर.टी. देशमुख, अक्षय मुंदडा, देविदास राठोड, प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्यासह अनेक नेते मोठ्या संख्येने गडावर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.