आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी असणाऱ्या परळीतील नाथ्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे विजयी झाले आहेत.
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र येत 8 सदस्यांची बिनविरोध निवड केली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत 5 सदस्य तर भाजप पुरस्कृत 3 सदस्य निवडून आले आहेत. मुंडे बहीण-भावाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले असले तरी वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार गौतम आदमाने यांनी माघार न घेता निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र या निवडणुकीत अभय मुंडे हे विजयी झाले आहेत.
पंकजा मुंंडे आणि धनंजय मुंडे याच्यात नेहमीच वाद बघायला मिळत असतो. एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढविणारे आणि टीका करणारे भाऊ-बहीण यांचे एकाच बॅनरवर फोटो लागल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. सरपंच पदासाठी मुंडेंचे चुलत भाऊ अभय मुंडे रिंगणात होते. त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे आव्हान होते. मात्र, हे आव्हान त्यांनी लिलया पेलले.
धनंजय मुंडेंचे 10 वर्षे वर्चस्व
मागील दोन टर्मपासून नाथ्रा ग्रामपंचायत राष्ट्वादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नाथ्रा ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यावेळी बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या मातोश्री या सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी अजय मुंडे हे देखील सरपंच म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांचे बंधू अभय मुंडे हे सरपंचपदी निवडून आल्याने सत्ता पुन्हा त्यांच्याच घरात राहिल्याचे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.