आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:मतदान कार्डला आधार लिंकसाठी गुरुजींची दुचाकीवर फिरून जनजागृती

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ऐका हो ऐका, आपल्या मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्या हो’ असे लाऊडस्पीकरद्वारे मतदारांना आवाहन करीत बीएलओ म्हणून नियुक्ती असलेले मुख्याध्यापक बाबासाहेब केदार हे सातेफळ (ता. केज) गावात जनजागृती करीत आहेत. राष्ट्रीय मतदान नोंदणी कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीचे काम करण्यासाठी केंद्रस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक काम पाहत आहेत. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान कार्डला आधार लिंक करण्याचे आदेश दिले आहेत. मतदारांनी दिलेल्या लिंकवर आधार लिंक करण्याची प्रक्रिया करून घ्यावी यासाठी जनजागृती करण्याचे काम हे मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत केले जात आहे.

केज तालुक्यातील साळेगांव केंद्रातील सातेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब केदार हे मतदारांनी स्वतः मतदार कार्डाशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी व्होटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून लिंक करण्यासाठी त्यांनी गावात गल्लोगल्ली फिरून दुचाकीवर भोंगा घेऊन लाऊडस्पीकरद्वारे आवाहन करत आहेत.

ज्या मतदारांना याबाबत काही समजले नसेल तर त्यांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत व त्या सोबत वापरीत असलेला मोबाईल नंबर घेऊन त्यांच्याकडे देण्याचे आवाहन त्यांनी केले. बाबासाहेब केदार यांच्या या अभिनव कार्याची चर्चा सुरू असून त्यामुळे मतदार वर्गात जनजागृती होत आहे. याला प्रतिसाद मिळत असून मतदान कार्डला नागरिक आधार कार्ड लिंक करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

ऐच्छिक तरी महत्त्वाचे
मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करणे हे ऐच्छिक असले तरी महत्त्वाचे आहे. यामुळे भविष्यात आपल्या नावाने होणारे बोगस मतदानाला चाप लावला जाऊ शकतो. याचे महत्त्व जनतेला पटवून देण्यासाठी सध्या बीएलओ जनजागृती करत आहेत. त्यामुळे नागरिकांचाही प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिक मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...