आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा:गुलबर्ग्याहून माजलगावमध्ये चार दिवसां आड येताे 8 लाखांचा गुटखा

दिलीप झगडे | माजलगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गुटख्यावर बंदी असली तरी बीड जिल्ह्यातील माजलगावात चक्क कर्नाटकातील गुलबर्गा येथून चोरट्या मार्गाने गुटखा पाठवला जात आहे. या शहरात एक दिवसाआड आठ लाख रुपयांचा गुटखा येताे आणि त्याची शहरात विक्री केली जात असल्याची माहिती सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यानंतर उजेडात आली. तालुक्यात मागील चार महिन्यांत ५० लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असला तरी अजूनही तस्करी आणि वाहतूक थांबायला तयार नाही.

माजलगावात मुख्य गुटखा माफियांसह अन्य चार जण असे पाच लोक विक्री करतात. प्रत्येकास वेगवेगळी टक्केवारी ठरलेली आहे. मुख्य गुटखा माफियाला ७५ टक्के वाटा तर त्याच्या अन्य चार साथीदारांना २५ टक्के वाटा मिळत असल्याची माहिती सोमवारी पथकाने केलेल्या कारवाईनंतर खुद्द आरोपीकडून पोलिसांना मिळाली. गुलबर्गा येथून माजलगावकडे विनाक्रमांकाच्या वाहनातून मध्यरात्री गुटखा आणला जातो. दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी गुटखा उतरवला जाताे. शहरातील नवा मोंढा, बायपास रोड, मनूर शिवार, एमआयडीसी, पॉवर हाऊस रोड, एमआयडीसी, पिताजीनगरीमागे आदी ठिकाणी गुटखा घेऊन वाहने येतात.

गाडी येण्यापूर्वीच अशा ठिकाणी टमटम, मोटारसायकल, छोटा हत्ती, ऑटोरिक्षा यांचा ताफा तयार असतो. गुलबर्गा येथून वाहन येताच केवळ दहा मिनिटांत गुटखा वाहनांत भरला जातो. गाडी कुठपर्यंत आली आहे, त्या गाडीच्या लोकेशनसाठी पाचही गुटखा माफिया संपर्कात असतात.

माहिती मिळाल्यास कारवाई करू
माजलगाव शहरात यापूर्वी गुटख्याची तस्करी थांबवण्यासाठी आम्ही कारवाई केलेली आहे. यापुढेही माहिती मिळाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. -धनंजय फराटे, पोलिस निरीक्षक, माजलगाव शहर

एका गाडीत विविध कंपन्यांचा गुटखा
एका गाडीमध्ये विविध कंपन्यांचा आठ लाख रुपयांचा गुटखा असतो. शहरासह ग्रामीण भागात दुचाकी व गोळ्या-बिस्किटांची वाहतूक करणाऱ्या ऑटोतून गुटख्याची विक्री केली जाते. आलेला गुटखा विक्रेते गोळ्या-बिस्किटांच्या रिक्षात दडवून विक्री करतात. काही जण मोटारसायकलीवर पिशवीत विक्री करतात.

बातम्या आणखी आहेत...