आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी ही बनवाबनवी:झटपट श्रीमंतीच्या नादात दहावी पास कृष्णा केसकर नाव बदलून झाला सराईत हॅकर

बीड / अमोल मुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुरुंगातून कोट्यवधींच्या हेराफेरीचा मास्टरमाइंड बीडच्या हिवरापहाडीचा

उज्जैन कारागृहात राहून कोट्यवधींची हेराफेरी करणारा तरुण अमर अग्रवाल हा बीड तालुक्यातील हिवरापहाडीचा कृष्णा अनंत केसकर असल्याचे समोर आले आहे. अमर अग्रवाल असे नाव बदलून त्याने अनेक गुन्हे केले. दरम्यान, मागील तीन-चार वर्षांत त्याचे कुटुंबीय त्याला भेटायलाही कारागृहात गेलेले नसल्याचे त्याचे वडील अनंत केसकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

गरीब कुटुंबातील कृष्णाला दोन भाऊ असून दोघेही शेती करतात. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील माध्यमिक शाळेत झाले. दहावीत तो शाळेतून दुसरा आला होता. त्यानंतर त्याने बीडच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून अभियांत्रिकीची पदविका घेतली. येथे तो संगणक शिकला. त्यानंतर पुढील शिक्षण व नोकरी करण्याच्या निमित्ताने त्याने पुणे गाठले. तिथे तो संगणक हाताळण्यात मास्टर झाला. इंग्रजीवरही त्याची पकड निर्माण झाली. आपल्या कौशल्याचा त्याने दुरुपयोग करत अनेकांना गंडा घालायला सुरुवात केली. झटपट श्रीमंतीच्या नादात तो सराईत हॅकर झाला.

वडील म्हणतात, कारागृह प्रशासन आमचा संपर्क होऊ देत नाही
कृष्णाचे वडील अनंत केसकर यांनी सांगितले की, कृष्णा पुण्यात होता. नंतर त्याच्या काही मित्रांनी त्याला फसवले. त्याच्यावर खोटे गुन्हे नोंद केले गेले. तो सुरतच्या कारागृहात असताना त्याला एकदा आम्ही भेटलो. नंतर तो उज्जैन कारागृहात गेला. त्याचा कधीतरी फोन येत असे. त्याने फोनवर आम्हाला सांगितले होते की, अधिकारी त्याच्याकडून चुकीचे काम करवून घेतात, धमकी देतात. त्यानंतर आम्ही अनेकदा कारागृहात फोन करून संपर्क केला. मात्र, अधिकारी आमचे बोलणे होऊ देत नसत. २०१८ पासून आपण त्याला भेटलोही नाहीत, असे अनंत केसकर म्हणाले.

हाॅटेलांच्या नावे बुकिंग, बनावट संकेतस्थळ
कृष्णाने अनेक बनावट संकेतस्थळ तयार केले. यावरून त्याने आॅनलाइन व्यवहार केले. शिवाय, अनेक देशात लोकांच्या बँक खात्यांची माहिती हॅक करून त्यावरून पंचतांरीकत, सप्त तारांकीत हाॅटेलांची बुकींग करायची, विमानाची तिकिटे बुक करायची आणि ऐनवेळी ती रद्द करून रिफंड म्हणून मिळणारी रक्कम त्याच्या किंवा कारागृह अधिकाऱ्यांच्या किंवा त्याने हॅक केलेल्या बँक खात्यावर मागवून घेतली गेली. व त्या खात्यावरुन ते पैसे इतरत्र फिरवले. यात, अनेक नागरिक, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खात्यांची माहिती घेत लाखो रूपयांची हेराफेरी केली.

लग्नासाठी कृष्णा झाला अमर अग्रवाल; मुलीला फसवले
२०१७ मध्ये ऑनलाइन मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून एका आयटी प्रोफेशनल तरुणीशी ओळख करत आपण अमर अग्रवाल असून कॅलिफोर्नियात एका कंपनीचे सीईओ असल्याचे सांगत लग्न करण्यासाठी यूएसएला येण्यास सांगितले. व्हिसा व तिकिटांसाठी ४ लाख रुपये उकळून तिची फसवणूक केली. या प्रकरणात पुणे पोलिसानी त्याला अटक केली होती.

...म्हणे स्विस बँकेत खाते, मुख्यमंत्र्यांशी ओळख
कृष्णाने नोकरीला लावतो म्हणून अनेकांना फसवले. आपली मुख्यमंत्र्यांशी ओळख आहे. स्विस बँकेत माझे खाते आहे, असे तो लोकांना सांगत असे. त्यासाठी त्याने आपल्या संगणकीय ज्ञानाचा वापर करून मुख्यमंत्री कार्यालयातून आलेले कॉल, स्विस बँकेकडून येणारे मेलही लोकांना दाखवले. हे सर्व त्यानेच मॅनिप्युलेट केले होते.

२०१२ मध्ये केला पहिला गुन्हा
पुण्यात कृष्णाची अनुज अस्थाना नावाच्या उत्तर प्रदेशातील आयटी प्रोफेशनलसोबत ओळख झाली. यूएसमध्ये नोकरी लावतो म्हणत कृष्णाने त्याच्याकडून ९ लाख रुपये उकळले. पैसे मागितल्यावर त्याचे अपहरण करून औरंगाबादेत आणले. अनुजच्या वडिलांना त्याने १५ लाख द्या, नाहीतर अनुजला मारून टाकील, अशी धमकी दिली. या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी त्याला अटक केली होती.

गुजरातमध्येही झाले गुन्हे नोंद
कृष्णाने एका गुजराती व्यक्तीचीही मोठी फसवणूक केली. या प्रकरणात त्याच्यावर सुरत पोलिसांत गुन्हा नोंद केलेला आहे. २०१७ मध्ये तो सुरतच्या कारागृहात होता. दरम्यान, तो मध्य प्रदेशातील गुन्ह्यातही पोलिसांना हवा असल्याने त्याला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. उज्जैनच्या भैरवगड कारागृहात ठेवले गेले तिथून त्याने कोट्यवधींची हेराफेरी केली.

बातम्या आणखी आहेत...