आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी गेवराई, शिरूर, वडवणी तालुक्यात गारांचा चांगला पाऊस झाला. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हरभऱ्याच्या आकाराएवढ्या गाराही बरसल्या. गेवराई तालुक्यातील उमापूर, तलवाडा, बोरी पिंपळगाव, मादळमोही, गेवराई , रेवकी, बागपिंपळगाव, राजापूरसह काही ठिकाणी गारा पडल्या. रब्बी हंगामातील नुकताच काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज, भाजीपाल्यासह आंब्याच्या मोहराचे नुकसान झाले. वडवणी तालुक्यातही ढोरवाडी, कान्हापूर, लक्ष्मीपूर, कवडगाव, मोरेवाडी, देवडी साळिंबा, पिंपरखेड यासह इतर गावांत गारांचा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
परभणी : सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस
शहरात शनिवारी सायंकाळी साडेपाचनंतर सोसाट्याचा वारा सुटण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रात्री पावणेआठच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. १५ ते २० मिनिटे पाऊस सुरू होता. त्यानंतर पाऊस थांबला. दरम्यान, दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
औरंगाबाद : टिटवी परिसरात वीज पडून तरुणाचा मृत्यू
सोयगाव तालुक्यातील टिटवी परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यासह गारा, विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. याच वेळी दाेघे भाऊ शेतात कपाशी काढण्यासाठी गेले होते. या पावसात दोघे भाऊ रस्त्याच्या दिशेने घराकडे मागेपुढे पळत असताना विनोद विलास सोनवणे (२८) या तरुणाच्या अंगावर वीज कोसळली व जागीच त्याचा मृत्यू झाला.
नांदेड : पावसाची हजेरी
शहरात शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हलक्या स्वरूपात हजेरी लावली. दहा मिनिटे झालेल्या या पावसाने काही काळ गारवा निर्माण झाला. सकाळी सात वाजता काही काळ शिडकावा झाला होता. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.