आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांकडून धरपकड:मशिदीवरील भोंग्यांविरोधात ‘हनुमान चालिसा’; मनसे जिल्हा अध्यक्षांसह चार जण अन् शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष स्थानबद्ध

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारपासून राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिल्याने पोलिसांनी जिल्ह्यातील १३८ मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या. दरम्यान, बीड शहरात भोंग्यावर हनुमान चालिसा म्हणन्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील माळीवेसच्या हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा म्हटला. आष्टीत भोंगे लावण्याच्या तयारीत असलेले मनसे शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षाला, तर नांदूरघाट (ता. केज) येथे मनसेच्या जिल्हाध्यक्षासह तालुकाध्यक्ष व अन्य दोघे अशा चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. माजलगावात हनुमान चालिसासाठी जमा झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना दुपारी १२ वाजता पोलिसांनी स्थानबद्ध केले. धारूर शहरात ११ ठिकाणी मशिदींवर भोंगा वाजवण्यास पोलिसांनी परवानगी दिली. वडवणीत कमी आवाजात अजान म्हटली. परंतु, कुठेही हनुमान चालिसा वाजली नाही. तालुक्यात पोलिसांनी ४ जणांना नोटिसा बजावल्यात. चालिसा पठण होण्यापूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली.

यांना घेतले ताब्यात : नांदूरघाट (ता. केज) येथे मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवला जाणार असल्याची माहिती मिळताच सकाळी १० वाजता पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्यासह आदींची धरपकड केली. तालुकाध्यक्ष कल्याण केदार, माळेवाडी शाखेचे गोविंद हाके, नांदूर विभाग प्रमुख सर्जेराव जाधव (कातळे) यांना ताब्यात घेतले. दुसरीकडे आष्टीत मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांना सकाळीच स्थानबद्ध केले. माजलगावात शहरातील हनुमान मंदिरासमोर दुपारी १२ वाजता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरतीला सुरुवात करताच मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखा आंबुरे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाघमारे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष रमेश जोगडे, गोविंद देशमाने, बालाजी मुळे, वैभव सोळंके, सुमीत इंगळे, वैभव इंगळे यांना स्थानबद्ध केले.

अंबाजोगाईत पोलिस बंदोबस्त : अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील कुठल्याही मशीदीसमोर अथवा मंदिरामधून हनुमान चालिसा वाजवला नाही. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी शहरातील रविवार पेठ, बडा हनुमान मंदिर येथे पोलिस बंदोबस्त वाढवला होता.

बीडच्या माळीवेस मंदिरात हनुमान चालिसा
बीड शहरातील माळीवेस, बशीरगंज येथील हनुमान मंदिरात बुधवारी दुपारी भोंग्यावर चालिसा लावण्यासाठी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी बीड शहर पोलिसांकडे परवानगी मागितली. परंतु, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर करत भोंग्याला परवानगी नाकारत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. त्यामुळे संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी शहरातील माळीवेस येथील हनुमान मंदिरात एकत्र येत हनुमान चालिसा पठण केली. या वेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरेंसह जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, सदाशिव बिडवे, वर्षा जगदाळे, करण लोंढे, श्रीकृष्ण गायके, अशोक सुरवसे, उमेश गायकवाड, कार्तिक जव्हेरी, दोडके आदी उपस्थित होते.

आष्टीत कायदेशीर कारवाईचा इशारा
आष्टी शहरातील प्रत्येक मंदिर व मशिदीवर असलेल्या भोंग्यांबाबत माहिती घेतली. नियमाप्रमाणे आवाजातच हे भोंगे वाजवण्यास परवानगी आहे. जर विना परवानगी भोंगे आढळून आले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांनी सांगितले.

वडवणी येथे कमी आवाजात झाली अजान
वडवणी पोलिसांनी तालुक्यातील चौघांना नोटिसा बजावल्या. शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी केल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. वडवणी शहरात पाच मशिदी असून हनुमान चालिसा वाजली नाही. नेहमीप्रमाणे मशिदीत कमी आवाजात अजान अदा केली.

धारूरमध्ये ११ ठिकाणी भोंग्यांना परवानगी
धारूर शहरात ११ ठिकाणच्या मशिदींवर एक महिन्यासाठी कमी आवाजात भोंगा वाजवण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. शहरामध्ये २० पोलिस कर्मचारी व १० होमगार्डचा बंदोबस्त दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्ही. एस. आटोळे यांनी दिली.

जिल्ह्यात १३८ मनसे कार्यकर्त्यांना बजावल्या नोटिसा
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी १३८ मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना सूचना देत तगडा बंदोबस्त तैनात केला. जिल्ह्यात मागील २४ तासांत पोलिसांनी १३८ मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...