आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा पहिले लग्न झालेले असताना दुसरा प्रेमविवाह केला. पुन्हा नांदायला न्यायला नकार दिला. पोलिसांत धाव घेतल्यानंतर नांदायला घेऊन गेल्यावर सासरच्या मंडळींनी छळ केला. सासऱ्याने बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवून अंघोळ करायला लावत विनयभंग केला. शिवाय, अघोरी कृत्य करण्यासाठी विवस्त्र करून मासिक पाळीच्या काळात होणारा रक्तस्राव काढल्याचा संतापजनक प्रकार बीड तालुक्यातील सौंदाणा येथे घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पीडितेने पुण्याच्या विश्रांतवाडी पाेलिसात याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. २७ वर्षीय पीडितेने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१९ मध्ये तिचा प्रेमविवाह सागर बाबासाहेब ढवणे (रा. सौंदाणा, ता. बीड) याच्याशी झाला होता. लग्नानंतर ते दोघे एक महिना कोल्हापुरात वास्तव्यास होते. त्यानंतर पुण्याच्या चंदननगरमध्ये ते राहण्यास आले. या वेळी सागर याचा यापूर्वीही एक विवाह झालेला असल्याची माहिती पीडितेला मिळाली. याबाबत तिने नवरा व सासूला जाब विचारला असता पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगून पीडितेला माहेरी पाठवले गेले. नंतर लॉकडाऊन लागल्याने पीडिता पुण्यात अडकून पडली व तिचा सासरच्यांशी संपर्क कमी झाला. लॉकडाऊननंतर पतीने पहिली पत्नी नांदायला आणल्याचे तिला कळले व पीडितेला नांदवण्यास सासरच्यांनी नकार दिला. २०२१ मध्ये पीडितेने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी पुन्हा तिला नांदायला नेले. सासरी तिचा छळ केला गेला. उपाशी ठेवले गेले. सप्टेंबर २०२२ मध्ये दिराने आपल्याला अघोरी विद्या येत असल्याचे सांगून त्यासाठी तुला मूलबाळ नसल्याने तु्झ्या मासिक पाळी काळातील रक्त लागेल व यामुळे ५० हजार रुपये मिळतील, असे सांगितले. एक दिवस सर्वांनी संगनमत करून पतीला बाहेरगावी पाठवले व विवस्त्र करून मासिक पाळीतील रक्तस्राव काढला.
सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिसात धाव
पतीने समजूत काढून पुन्हा पीडितेला पुण्याला वास्तव्यास नेले हाेते. मात्र नोव्हेंबर २०२२ मध्ये मावस दिराने येऊन पतीला नेले. शोधासाठी पीडिता गावी आली असता या कुटुंबाने तीन महिन्यांपूर्वीच गाव सोडल्याचे कळले. त्यामुळे पीडितेने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पुण्याच्या विश्रांतवाडी ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पती, सासू, सासरा, दीर, मावस दीर, भाचा व गावातील एक व्यक्ती या सात जणांविरोधात विनयभंग, अनैसर्गिक कृत्य, जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.