आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य समस्यांचे प्रतिबिं:आरोग्याचे प्रश्न दुप्पट, महिला-बालकांवर 2 % प्रश्नच पटलावर

बीड3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१५ व्या विधानसभेच्या सन २०२० ते २०२२ या तीन वर्षांतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोविड संकटातील तीव्र आरोग्य समस्यांचे प्रतिबिंब वाढलेल्या प्रश्न संख्येने अधोरेखित झाले आहे. १४ व्या विधानसभेच्या तुलनेत आरोग्यविषयक प्रश्नांची टक्केवारी ५ वरून १०.४२ टक्के वाढली, तर दुसरीकडे बालक व महिला विषयांशी निगडित प्रत्येकी २ टक्केच प्रश्न पटलावर आले आहेत. ऐरणीवर आलेल्या बालविवाह समस्येचा मुद्दा २ आमदारांनी उपस्थित केला.

लोककेंद्री कारभारासाठी पाठपुरावा करणाऱ्या मुंबईच्या संपर्क संस्थेने गुरुवारी (४ ऑगस्ट) ‘कोविड छायेतील विधानसभा अधिवेशने : आमदारांची कामगिरी’ हा अभ्यास अहवाल प्रकाशित केला. यातून ही बाब समोर आली. मार्च २०२० ते मार्च-एप्रिल २०२२ या काेविड काळात विधानसभेची एकूण ७ अधिवेशने झाली. यापैकी धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाच्या ३ अर्थसंकल्पीय अधिवेशनांची निवड या अभ्यासासाठी केली आहे. या तिन्ही अधिवेशनात विचारल्या गेलेल्या सर्व १,५९२ तारांकित प्रश्नांचा संपर्कने अभ्यास केला. या प्रश्नांमध्ये १६६ प्रश्न आरोग्यविषयक होते. अभ्यासलेल्या प्रश्नांमध्ये कोविडचा थेट संदर्भ १४३ वेळा आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राविषयीचे प्रश्न गत विधानसभेतील अधिवेशनात ३ टक्के होते, तर यंदाच्या तीन अधिवेशनांत त्याची संख्या चौपट वाढून १२ टक्क्यांवर पोहोचली. आरोग्यविषयक सर्वाधिक प्रश्न विचारले गेले ते मुंबई उपनगर जिल्ह्यातून. त्याखालोखाल नागपूर व पुणे जिल्ह्यातून विचारले गेले. कोल्हापूर, हिंगोली, भंडारा, वाशिम, परभणी आणि नंदुरबार या जिल्ह्यांतून आरोग्यविषयक एकही प्रश्न विचारला गेला नाही. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाच्या शुल्ककपातीसह इतर शिक्षणविषयक प्रश्नांची संख्याही या अधिवेशनात ७६ इतकी राहिली. शिक्षणविषयक मूलभूत सुविधांबाबतचे, वर्गखोल्यांची दुरुस्ती, वरळी (मुंबई) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात सोयी-सुविधा पुरवणे इत्यादीबाबतचे १२ प्रश्न, तर शिक्षण व्यवस्थेतल्या गैरव्यवहारासंबंधीचे १२ प्रश्न यात समाविष्ट आहेत. शिक्षणविषयक एकही प्रश्न विचारला गेला नाही असे १२ जिल्हे आहेत. क्रीडाविषयक उपस्थित झालेल्या आठ प्रश्नांत राज्यात दर्जेदार क्रीडापटू तयार करण्यासाठी धोरण आखण्याबाबत हा एक प्रश्न वगळता बाकी सर्व प्रश्न हे क्रीडा संकुल उभारणे, त्यासाठीचा निधी आणि क्रीडा शिक्षकांच्या नेमणुकीबाबत आहेत.

‘कोविड छायेतील विधानसभा अधिवेशने : आमदारांची कामगिरी’ या विषयावरील संपर्क संस्थेच्या अभ्यासाचा निष्कर्ष मानव विकास निर्देशांकाबाबत निराशा सिंचन, मानव संसाधन, वीज, अनुदान, आदिवासी, रेशन, गुन्हेविषयक प्रश्नांची संख्याही २ टक्के इतकी राहिली. अल्प मानव विकास निर्देशांक असलेल्या जिल्ह्यांतून अधिकाधिक प्रश्न पुढे यावेत ही अपेक्षा मात्र लोकप्रतिनिधींकडून पूर्ण झालेली नाही. कारण अल्प मानव विकास निर्देशांक असलेल्या राज्यातील ९ जिल्ह्यांची मिळून प्रश्न संख्या १९६ ही मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याच्या एकत्रित प्रश्न संख्येच्या (३८८) जवळपास निम्मी आहे.

पक्षनिहाय कामगिरी भाजप ५३.८ % शिवसेना१५.६% काँग्रेस १५.२ % राष्ट्रवादी काँग्रेस ८.५ % प्रश्न

प्राधान्याचे पहिले ६ विषय सुविधा : १७६ प्रश्न, आरोग्य : १६६ प्रश्न, शेती : १२५ प्रश्न, पाणी : ९६ प्रश्न, पर्यावरण : ८१ प्रश्न, बेकायदेशीर व्यवहार : ७८ प्रश्न

बालकांविषयी ३४, महिलांविषयी २४ प्रश्न कोविडकाळात बालकांची बरीच घुसमट झाली. नव्या समस्यांना बालकांनी तोंड दिले. प्रत्यक्षात बालकांशी निगडित पटलावर आलेले प्रश्न ३४ आहेत. राज्यातील तब्बल १७ जिल्ह्यांतून बालकांविषयीचा प्रश्न विचारला गेला नाही. कोविडमध्ये पतीचे निधन झाल्याने विधवा झालेल्या राज्यातल्या महिलांची संख्या १० हजारांच्या पुढे गेली आहे. अन्य अनेक समस्या महिलांना भेडसावल्या. प्रत्यक्षात, महिलांविषयीचे २४ प्रश्न उपस्थित झाले. धोरणकर्त्या सभागृहात बालक-महिला हे विषय प्राधान्याचे नसणे, हे काळजी करण्यासारखे.

बातम्या आणखी आहेत...