आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:ताडसोन्ना येथे 820 जणांची आरोग्य तपासणी, तर धारूरला स्वच्छता मोहीम

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथे गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत असून नवगण राजुरी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. राज्यातील नामंवत कीर्तनकारांची कीर्तनसेवा या ठिकाणी होत असून प्रवचनही होत आहे. तसेच ताडसोन्ना येथे नागरिकांसाठी गणेशोत्सवानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. धारूर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, तर गेवराई येथे नवनिर्माण गणेशोत्सवालाही उत्साहात प्रारंभ झाला.

वर्गणी न मागता गणेशोत्सव
बीड येथील बार्शी नाका परिसरात श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वतीने वर्गणीची पध्दत बंद करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अध्यक्ष अमोल घोडके व सहकारी यांनी यासाठी पुढाकार घेतला.

नवनिर्माण गणेश, गेवराई
गेवराई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनिर्माण गणेशोत्सव शास्त्री, चौक येथे गणरायाची स्थापना करण्यात आली. मनसेे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या हस्ते या गणरायाची स्थापना करण्यात आलेली आहे. यावेळी गणेश पवार, डॉ. संभाजी जाधव, विशाल दाभाडे, मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष कृष्णा राठोड, विलास मस्के, गणेश पवार, सुशील टकले, अशोक नरवडे, विशाल मडकर आदींची उपस्थिती होती.

बोरगाव : एक गाव एक गणपती
केज तालुक्यातील बोरगाव ( बु. ) येथील तरुणांनी गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना अमलात आणून गावात एकाच ठिकाणी शिवसेवा गणेश मंडळाने श्रीच्या मुर्तिची प्रतिष्ठापना केली आहे. बोरगाव (बु.) येथील तरुणांनी एकत्र गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना अंमलात आणली आहे. शिवसेवा गणेश मंडळाचे अध्यक्ष मनोजकुमार गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ ऑगस्ट राेजी सायंकाळी ७ वाजता विधिवत पूजा करून “श्री”च्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गावातील जेष्ठ व तरूण दांपत्यांना पूजेचा मान दिला गेला. गावातील ज्येष्ठ, युवक आणि बालगोपालांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत उत्साहात “गणपती बाप्पा मोरया” चा जयघोष केला. गणेश मंडळातर्फे वक्तृत्व व रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार असून विसर्जन दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दरम्यान, केज ठाण्याचे फौजदार वैभव सारंग, बिट जमादार राजू गुंजाळ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी भेट देऊन मंडळास सूचना करीत एक गाव एक गणपती संकल्पनेचे कौतुक केले.

धारूर येथे स्वच्छता मोहीम
धारूर येथील गायकवाड गल्ली येथील शिवछत्रपती गणेश मंडळ हे नावाजलेले गणेश मंडळ असून सामाजिक उपक्रम राबविणे या गणेश मंडळाचा मूळ हेतू आहे. या हेतूप्रमाणे गणेशाची स्थापना होताच दुसऱ्याच सामाजिक उपक्रमाला सुरुवात केली असून १ सप्टेंबर रोजी सकाळच्या वेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नाथ मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. परिसरातील सर्व घाण यावेळी काढण्यात आली आहे. यामुळे परिसर अगदी स्वच्छ व सुंदर दिसून येत आहे. यापुढेही ही सामाजिक उपक्रमाची चळवळ पुढील दहा दिवस सुरू ठेवण्यात येणार असल्याचे शिवछत्रपती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

नवगण राजुरीत कीर्तन
नवगण राजुरी येथे गणेश उत्सवानिमित्त सुरु असलेल्या सप्ताहात तिसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांची कीर्तनसेवा पार पडली. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मूर्खांच्या संगतीत बसून बरबाद होण्यापेक्षा संताच्या संगतीत हरिपाठ जरी म्हणता आला तरी जीवनाचे सार्थक होईल. ज्या घरातून अध्यात्माचे बाळकडू मिळते, त्या घरात नेहमी सुख नांदत असते. आपल्या नर्मविनोदी शैलीने कीर्तन करताना त्यांनी श्रोत्यांना खिळून ठेवले. भक्तिमार्गविषयी बोलताना ते म्हणाले एकदा गणेशाचे महान भक्त चिंतामणी यांना अहंकाराची बाधा झाली. त्या वेळी संत तुकाराम यांनी त्याचा अहंकार नष्ट केला. अहंकार हा भक्ती मार्गातील सर्वात अडथळा आहे जो त्यातून स्वतःला लांब ठेवतो तोच परमेश्वराच्या जास्त जवळ असतो. यावेळी आचार्य अमृतस्वामी महाराज, नेहा क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, श्रुती क्षीरसागर, सरपंच गणेश ससाणे, उपसरपंच भगवान बहिर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.

ताडसोन्नात आरोग्य तपासणी
गणेश उत्सवानिमित्त महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात ८५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. युवा नेते बाळासाहेब नागटिळक यांनी स्वखर्चाने या शिबिराचे आयोजन केले होते. शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. या शिबिरात पिंपळनेर आणि ताडसोन्ना या सर्कलमधील ३२ गावातून नागरिक हजर होते. माजी मंत्री बदामराव पंडित म्हणाले की, गणेश उत्सवाच्या माध्यमातून बाळासाहेब नागटिळक यांनी स्वखर्चाने ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून एक चांगला सामाजिक उपक्रम राबवला आहे. यावेळी प्रशांत लांडे, दुष्यंत डोंगरे, भारतराव मते, सोमनाथ माने, भारत गिरी, महेश शिंदे, सोमनाथ मुंडे, बालासाहेब मुंडे, बंकटराव माने, गोविंद शिंदे, आकाश गायवळ, बिबीशन आबूज, संदिपान मुंडे, दत्तात्रेय मुंडे, नाना जोशी आदी हजर होते.

पाटोदा येथे छत्रीवाला गणेशाची उत्साहात स्थापना
पाटोदा येथील रस्तागल्ली भागातील संत नरहरी महाराज छत्रीवाला गणेशाची स्थापना सतीश महाराज उरणकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी युवा सेना आष्टी विधानसभा मतदारसंघ प्रमुख मुकूंद शिंदे, माजी नगरसेवक अमोल दिक्षीत, कृष्णा चौरे, बबलू दिक्षीत, अजय डोरले, गजानन उदावंत, अमृत भोसले, कुणाल दिक्षीत, शहाणे आदींची उपस्थिती होती. महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. मंडळाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...