आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांत पाणी:बीड जिल्ह्यात परतीचा पाऊस दमदार; सात महसुली मंडळांत अतिवृष्टीने पिकांत पाणी

टीम दिव्य मराठी | बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी रात्री परतीच्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला झोडपून काढले असून जिल्ह्यातील ७ महसूल मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टी नोंदली गेली आहे. जिल्ह्यातील ८ महसूल मंडळांमध्ये ६० मिलिमीटर पाऊस नांेदला गेला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात यापूर्वी शंखी गोगलगायीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले असताना आता पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह कापसाचे मोठे नुकसान झाले असून पिकात पाणी साचले आहे. एेन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा घास पावसाने हिरावला आहे.

माजलगाव धरणही ओव्हर फ्लो झाले असून या धरणाचे अर्धा मीटरने तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सहा हजार क्युसेक पाण्याचा सिंदफणा नदीत विसर्ग होत आहे. केज तालुक्यातील धनेगावचे मांजरा धरण भरले ७० टक्के भरले आहे. दुसरीकडे शिरूर तालुक्यातील सिंदफणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यातील १५ गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

बीड शहरात गुरुवारी रात्री साडेनऊ नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बीड तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील नवगणराजुरीत अतीवृष्टी झाली आहे. तर पेंडगाव आणि लिंबागणेश महसुली मंडळात ५९.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. डोकेवाडा साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला असून शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे. तालुक्यातील आठ महसुली मंडळांत जोरदार पाऊस झाला आहे. तालुक्यातील वाणगाव, चौसाळा, पिंपळनेर, तांदळवाडी भिल्ल या गावात कपाशी, सोयाबीन आणि बाजरीच्या पिकात पाणी साचले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सात महसुली मंडळांत अतिवृष्टी
जिल्ह्यातील बीडसह, पाटोदा, आष्टी, गेवराई या तालुक्यांतील सात महुसली मंडळांत पुढील प्रमाणे अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील नवगणराजुरी ७१.३ मिलिमीटर, पाटोदा तालुक्यातील थेरला महसुली मंडळात ६५.३, तर अंमळेनर ७४.०६, आष्टी तालुक्यातील आष्टी आणि कडा महुसली मंडळात सारखाच म्हणजे ६७.३ इतका मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सिंदफणा प्रकल्प ओव्हरफ्लो
परतीच्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सिंदफणा मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाल्याने शिरूर शहरासह परिसरातील १५ गावांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील सिंदफणा नदी दुथडी भरून वाहत आहे. परंतु यंदाच्या हंगामातील काढणीला आलेले सोयाबीन व बाजरीचे नुकसान झाले आहे. सिद्धेश्वर प्रकल्प भरल्याने नागरिकांनी गर्दी केली होती.

अंबाजोगाई : ३३ मिमी पाऊस
गुरुवारी रात्री पाच महसूल मंडळांत सरासरी ३३ मिमी पाऊस झाला आहे. अंबाजोगाई महसूल मंडळात १३.३, पाटोदा २२, लोखंडी सावरगाव १३.८, घाटनांदुर १२.८,बर्दापूर २२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या आठवडाभरात सर्वाधिक पाऊस पाटोदा मंडळात झाला असून तो ६३ मिमी इतका आहे. तर सर्वात कमी अंबाजोगाई मंडळात पाऊस झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...