आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच:राज्यात 8 महिन्यांत जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या कामांसाठी 722 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली 1.50 कोटीची लाच

बीड / अमोल मुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठ लाखांच्या लाच प्रकरणात अटक शिक्षणाधिकारी वैशाली वीर (झनकर) यांना अटक करून घेऊन जाताना पोलिस - Divya Marathi
आठ लाखांच्या लाच प्रकरणात अटक शिक्षणाधिकारी वैशाली वीर (झनकर) यांना अटक करून घेऊन जाताना पोलिस
  • जानेवारीपासून आतापर्यंत सर्वाधिक महसूल व पोलिस खात्याचे कर्मचारी सापळ्यात

माणसाच्या जीवनात सोळा संस्कार होत असतात. मात्र, हे संस्कार पूर्ण करण्यासाठी राज्यातील सरकारी कार्यालयांत लाच दिल्याशिवाय पानही हलत नसल्याचे चित्र आहे. प्रसूतीपासून ते विवाह नोंदणीसाठी आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठीही नागरिकांना लाच द्यावी लागत आहे. राज्यात जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५१७ प्रकरणांत कारवाया केल्या. यात ७२२ लाचखोरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे नोंद आहेत. गतवर्षीच्या तुलनेत २०२१ च्या ८ महिन्यांत ११४ कारवाया अधिक झाल्या आहेत. यंदा २८ टक्क्यांनी कारवाया वाढल्या आहेत. दरम्यान, आठ महिन्यांच्या या काळात विविध प्रकारच्या शंभराहून अधिक कामांसाठी सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तब्बल १ कोटी ४९ लाख ९२,२०० रुपयांची लाच स्वीकारल्याचे एसीबीच्या अहवालावरून समोर आले आहे.

‘दिव्य मराठी’ने लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालाच्या केलेल्या विश्लेषणातून पोलिस विभागाने सर्वाधिक रक्कम लाच स्वरुपात स्विकारल्याचे स्पष्ट झाले आहे तर पाठोपाठ महसूल विभागाचा क्रमांक आहे. महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अगदी पवित्र समजला शिक्षण विभागही लाचखोरीत टॉप फाइव्ह मध्ये आहे. ‘कुणीही लाच मागत असेल तर संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी’ असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबाद परीक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी केले आहे.

कामगार : ६९ कामगारांच्या नोंदणीसाठी साताऱ्याचे सहायक कामगार आयुक्त संजय महानवर २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडले.

महावितरण: नादुरुरस्त राेहित्र बदलून देण्यासाठी नळदूर्ग (जि. उस्मानाबाद) येथील महावितरणचा सहायक अभियंता हनुमंत सरडे याला ५५ हजारांची लाच घेताना अटक झाली.

पोलिस : गुन्ह्याच्या तपासात मिळालेली ऑडिओ क्लिप व्हायरल न करण्यासाठी व प्रकरणात न अडकवण्यासाठी २ कोटींची लाच मागून १० लाख स्विकारणारा सेलू (जि.परभणी) येथील डीवायएसपी राजेंद्र पाल एसीबीने गजाआड केला.

पेन्शन : सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सुरु करण्यासाठी १० हजारांची लाच घेताना नागपूर महानगर पालिकेचा लिपीक राजेंद्र गजभिये पकडला गेला.

नामांतरण : जमीन नावची करुन साताबारा व इतर कागदपत्रे देण्यासाठी १ लाख २५ हजारांची लाच घेताना आगर टाकळी (जि. नाशीक) येथील एसीबीने रंगेहाथ पकडला.

प्रसूती करण्यासाठी ४ हजार, विवाह प्रमाणपत्रासाठी ५००, तर मृत्यू प्रमाणपत्रासाठी पाच हजारांची लाच प्रसूतीसाठी ४ हजारांची लाच घेताना कुर्डूवाडीचे वैद्यकीय अधिकारी संतोष आडगळे पकडले गेले. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी ५०० रुपयांची लाच घेताना सोलापूर मनपाचे लिपिक सल्लाउद्दीन शेख व मनोज पाटोळंेना अटक केली गेली. मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार घेणारे पालघर ग्रामीणचे वैद्यकीय अधिकारी स्वप्निल बोदमवाड, नितेश पांडे यांना अटक झाली.

शिक्षण : शाळेच्या २० टक्के अनुदानाची रक्कम देण्यासाठी ८ लाखांची लाच घेणारी महिला शिक्षणाधिकारी वैशाली वीर (झनकर) यांना एसीबीने गजाआड केले.

आरोग्य : वैद्यकीय उपकरणे पुरवण्याचे कंत्राट देण्यासाठी १५ लाख मागून ५ लाख स्वीकारणारा ठाणे मनपाचा वैद्यकीय अधिकारी राजू मुरूडकर सापळ्यात अडकला.

महसूल : वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी माजलगाव (जि.बीड) येथील उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड ६५ हजारांची लाच घेताना सापळ्यात अडकले.

12 लाख 22 हजार लाच कर्मचाऱ्यांनी घेतली
जिल्हा परिषद/पंचायत समिती मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत आणि तालुकास्तरावर असलेल्या पंचायत समितीतही लाचखोरी फोफावलेली आहे. घरकुलाचा लाभ देण्यासाठी, रोजगार हमीचे बिल काढण्यासाठी, रहिवासी प्रमाणपत्रासाठी, ग्रामपंचायतसंबंधी कामासाठी जि.प., पं.स.च्या कर्मचाऱ्यांनी १२ लाख २२ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारली.

10 लाख 53 हजार लाच शिक्षणकर्मींनी घेतली
शिक्षण : ज्ञानदानाचे पवित्र काम करणारा शिक्षण विभागही लाचखोरीत टॉप-५ मध्ये आहे. गुणपत्रक देण्यासाठी, शाळांना अनुदान देण्यासाठी, थकीत वेतनासाठी, पेन्शनसाठी शिक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांनी १० लाख ५३ हजार ६०० रुपयांची लाच स्वीकारली.

31लाखांची लाच महसूल कर्मचाऱ्यांनी घेतली
महसूल : महसूल विभागात सर्वाधिक १२८ लाचखोरीची प्रकरणे दाखल झाली. यात १२८ लाचखोर एसीबीच्या गळाला लागले. जमीन नावाची करण्यासाठी, फेरफार, वाळू वाहतुकीसाठी व इतर कार्यालयीन कामांसाठी महसूलच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ३१ लाख २०,७०० रुपये लाच घेतली.

17 लाख 90 हजारांची लाच घेतली
महानगरपालिका : सर्वसामान्यांच्या कामांसाठीही महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हात धुऊन घेतले. विवाह-जन्म प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, नगर रचनासंंबंधी काम, नळजोडणी यासाठी मनपा कर्मचाऱ्यांनी १७ लाख ९० हजारांची लाच घेतली.

36 लाख 77 हजारांची लाच पोलिसांनी घेतली
पोलिस : आठ महिन्यांत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध १०५ सापळे रचण्यात आले आहेत. यात १५६ पोलिसांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी, अटक न करण्यासाठी, वाहन सोडण्यासाठी, गुन्हा नोंद न करण्यासाठी लाच घेण्यात आल्याचे उघड झाले.

(आकडेवारी स्त्रोत : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र)

बातम्या आणखी आहेत...