आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बळीराजाला विवंचनेचा ‘फास’:बीड जिल्ह्यात शेतकऱ्याला वाटत होती मुलांच्या भविष्याची काळजी, तर नांदेडमध्ये गळफास घेऊन शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

शिरूर (जि. बीड)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपादित जमिनीचा मावेजा न मिळाल्याने संपवले जीवन

अवघी दोन एकर कोरडवाहू जमीन, उत्पन्नाचे तोकडे साधन, मुलीचे लग्न कसे करावे या विवंचनेत मुलीच्या शेतकरी वडिलांनी राहत्या घरातच पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी तालुक्यातील रुपूर येथे घडली. बाळू नारायण मंडलिक (४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुक्यातील रुपूर येथील बाळू यांना एक मुलगी व दोन मुले असून मुलगी लग्नाला आल्याने तिचे लग्न कसे करावे, ही चिंता त्यांना सतावत होती. उदरनिर्वाह भागवण्यासाठी ते भावाच्या बँड पथकात ढोल वाजवायचे. पैसे नसल्याने त्यांनी रब्बी पेरणी केली नाही. सर्व अडचणींमुळे बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सुताच्या दोरीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती भाऊ तुकाराम सीताराम मंडलिक यांनी शिरूर ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या मृतदेहाचे शिरूर येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. शेतकऱ्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे.

संपादित जमिनीचा मावेजा न मिळाल्याने संपवले जीवन
नांदेड | अर्धापूर तालुक्यातून जाणाऱ्या तुळजापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ साठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा मावेजा मिळण्यासाठी उशीर होत असल्यामुळे शेतकरी रमेश पुंडलिक बारसे (४२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ३) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून यात आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले.

अर्धापूर शहरातील अहिल्यादेवीनगरातील रमेश यांची अर्धापूर शिवारातील शेतजमीन अर्धापूर पूर्व वळण रस्त्याच्या कामासाठी संपादित केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ साठी १६ गुंठे संपादित केली आहे. अर्धापूर शिवारातील जमिनीला जास्तीचा मावेजा मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. तीन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. अखेर शेतकरी बारसे यांनी बुधवारी कंटाळून आपल्या राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे.

शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात बुधवारी दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रुपूर येथील ४० वर्षीय शेतकऱ्याने मुलीचे लग्न कसे करावे, या विवंचनेत गळफास घेतला. तर संपादित केलेल्या शेतजमिनीचा मावेजा मिळण्यासाठी उशीर होत असल्यामुळे भविष्याची चिंता सतावत असलेल्या शेतकरी रमेश पुंडलिक बारसे (४२) यांनी जीवनयात्रा थांबवली.

बातम्या आणखी आहेत...