आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावाद:अस्सं सासर सुरेख बाई! एक सून कानडी, दुसरी तेलगू; कुटुंब सांभाळते मराठी सासू

उदगीर (जि.लातूर) / नितीन पोटलाशेरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकाच्या सीमेवरील उदगीर शहरात (जि. लातूर) मात्र एक असं कुटुंब आहे, जिथं कर्नाटक, तेलंगण आणि महाराष्ट्र अशा तिन्ही संस्कृतींचा मिलाफ पाहायला मिळतो. कुटुंबात एक सून तेलंगणाची, दुसरी कर्नाटकाची आहे, तर परिवाराचा डोलारा मात्र मराठी सासू सांभाळत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावादावरून राजकीय व्यक्तींकडून दररोज प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. दोन्ही राज्यांतील लोकांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेषभावना निर्माण होईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पहिल्या दिवशी जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल फॅमिली डे’ निमित्त भिन्नतेत एकतेने राहणाऱ्या या बहुभाषिक कुटुंबाविषयी जाणून घेऊयात..

अंबादास श्रीमंगले हे मूळ उदगीरचे रहिवासी. त्यांनी संगारेड्डी जिल्ह्यातील जहिराबाद येथील नरसम्मा मंबापुरम यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर नरसम्मा यांचे नाव सुशीलाबाई असे केले गेले. दांपत्याला दोन मुले आणि दोन मुली आहेत. काही वर्षांपूर्वी अंबादास यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सुशीलाबाई या रवी व गोपीनाथ या दोन मुलांना घेऊन उदगीरमध्येच राहत आहेत. श्रीमंगले कुटुंब पूर्णपणे मराठी, पण सुशीलाबाई यांचे माहेर जहिराबाद असल्याने त्यांना तेलंगण व कर्नाटकविषयी आपसूकच ओढ आहे. त्यामुळे दोन्हीकडे त्यांनी रोटी-बेटीचा व्यवहार कायम ठेवला. रवीसाठी त्यांनी जहिराबाद येथील नवनीता यांची निवड केली, तर लहान मुलगा गोपीनाथची लग्नगाठ १० वर्षांपूर्वी बिदर येथील श्वेता यांच्यासोबत बांधली. सुशीलाबाई यांचे शिक्षण जेमतेम आहे. पण त्यांना मराठी, हिंदी, तेलगू, कन्नड या चारही भाषा अस्खलितपणे बोलता येतात. त्यामुळे दोन्ही सुनांना त्यांचा सर्वात मोठा आधार आहे. विशेष म्हणजे सुशीलाबाई यांनी त्यांच्या गीता आणि राणी या दोन्ही मुलींचे लग्न कर्नाटकात केले आहे. गीताचे सासर कलबुर्गीत आहे, तर दुसरी मुलगी राणी ही शेडम या गावी राहते.

कुटुंबाची मातृभाषा मराठी नवनीता तेलगू तर श्वेता यांना कानडी भाषा येते. सासू सुशीलाबाई एकीशी तेलगू, दुसरीशी कानडी, मुलांशी व नातवांशी मराठीत बोलतात. कुटुंबातील सगळेच जण मराठी भाषेत शिक्षण घेतात. अधूनमधून हिंदीतूनही संवाद केला जातो. सुनांचं काही चुकलं तर त्यांना कुठल्या भाषेत रागावता, असा प्रश्न विचारताच सुशीलाबाई श्रीमंगले म्हणाल्या, त्यांना कधी रागावण्याची वेळच येत नाही. दोघी त्यांच्या ठिकाणी सगळं काही व्यवस्थित सांभाळून घेतात.

इडली-डोसा, कधी वडापाव, गुडपांगडी श्रीमंगले कुटुंबात दर रविवारी नाष्ट्याचा मेनू आलटून-पालटून असतो. सर्वांच्याच आवडीचे पदार्थ बनवले जातात. एका रविवारी इडली-सांबार, डोसा असा मेनू असेल तर दुसऱ्या रविवारी कर्नाटकातील गुडपांगडीचा (आप्पे) आस्वाद घेतला जातो. पुढच्या सुटीला पावभाजी, वडापावही आवर्जून बनवत असल्याचे श्वेता यांनी कानडीत सांगितले.

दहावीची अंबिका आई-काकूला शिकवते मराठी रवी व नवनीता यांची दहावीतील मुलगी अंबिका आई-काकू श्वेता यांना मराठी शिकवण्याचे काम करते. श्वेता यांच्या चार अपत्यांचा अभ्यास घेण्याची जबाबदारीही तिच्याकडेच आहे. कधी-कधी ‘करते’च्या ऐवजी ‘करतो’ असा शब्द संबोधला गेल्यानंतर आई-काकूला पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्दांच्या उच्चाराबद्दल मराठी व्याकरण उलगडून सांगावे लागत असल्याचे अंबिकाने हसत सांगितले.

बातम्या आणखी आहेत...