आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगाराच्या आशा:माजलगाव औद्योगिक वसाहतीत 5 उद्योग, 700 बेरोजगारांच्या हाताला मिळणार काम

माजलगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत ४५० एकर जमिनीवर साकारत असून वीज, रस्ते, पाणी अशा पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांत ५५ उद्योगपतींनी विविध प्रकल्पांसाठी या वसाहतीत भूखंड खरेदी केले आहेत. शिवाय माजलगाव शहराबाहेरून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून माजलगाव प्रकल्पामुळे मुबलक पाणी आहे. वस्त्रोद्योगासह ऑइल रिफायनरी प्रोजेक्ट, डाळ मिल असे पाच उद्योग उभारत असल्याने कोरोनाच्या संकटानंतर सातशे बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असून या पंचाताराकित औद्योगिक वसाहतीमुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे.

माजलगावाचे तत्कालीन महसूल राज्यमंत्री आमदार प्रकाश सोळंके यांनी बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसाठी पाठपुरावा केला. त्यांनतर राज्य मंत्रिमंडळाने माजलगावात या वसाहतीला मंजुरी दिली. त्यांनतर वसाहतीसाठी ४५० एकर जमीन अधिगृहित करून शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजाही देण्यात आला आहे. अधिगृहित जमिनीत डांबरी रस्ते, विजेचे खांब, पाण्याची टाकी अशा मूलभूत सुविधांसाठी ५० कोटींच्या निधीची तरतूद झाल्याने ही कामे पूर्ण केली. दळणवळणासाठी कल्याण-विशाखापट्टणम आणि खामगाव-पंढरपूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग, पाण्यासाठी जवळच असलेले माजलगाव धरण आणि १३२ के.व्ही सबस्टेशनमुळे विजेचा प्रश्न सुटला आहे. या मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने पाच वर्षांत या वसाहतीत ५५ प्लॉटची विक्री होऊन उद्योग उभारणीला गती मिळाली आहे.

दाल मिल प्रकल्पामुळे १०० जणांच्या हाताला काम माजलगाव शहरातील उद्योगपती गोपाल बजाज यांचा डाळ मिलचा प्रकल्प येथे तयार होत असून तूर, हरभरा खरेदी करून त्यापासून दाल तयार करून ती विक्री करण्यात येणार आहे. दररोज तुरीची ७० ते ८० क्विंटल, तर हरभऱ्याची शंभर क्विंटल डाळ तयार करणाऱ्या उद्योगाची उभारणी झाल्यानंतर १०० जणांच्या हाताला काम मिळणार आहे.

सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणी बीडच्या तापडिया उद्योगपतींनी या वसाहतीत २५ एकर जागा खरेदी करत २०० कोटी रुपये खर्चून सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची उभारणी करून सोयाबीनवर प्रक्रिया करून थेट खाद्यतेलाची निर्मिती करणारा कारखाना उभारला जात आहे.

१५ कोटींचा ऑइल रिफायनरी प्रकल्प माजलगाव शहरातील उद्योजक संतोष अब्बड हे १० एकरांत १५ कोटी रुपयांचा ऑइल रिफायनरी प्रकल्प उभारत असून यात सोयाबीन, सूर्यफूल, सरकी यापासून तेल तयार करून ते एक ते १५ किलोची पॅकिंग करून थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याने १०० बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...