आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी येथे दहावीच्या पेपरच्या दिवशीच मुलीचे लग्न लावले:वऱ्हाडी, आचारी-मंडपवाल्यांसह 200 जणांवर गुन्हा

परळी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपनवाडी येथील १६ वर्षीय मुलीचा नंदागौळ (ता. परळी) येथील तरुणाशी विवाह लावून दिल्याप्रकरणी वधू-वरांचे आई, वडील व वऱ्हाडी अशा २०० जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.

चोपनवाडीची (ता.अंबाजोगाई) १६ वर्षीय मुलगी घाटनांदूर येथील श्री शंकर विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकते. सोमवारी तिचा गणिताचा पेपर असताना तिचा नंदागौळ येथील २४ वर्षीय तरुणाशी नंदागौळ येथे विवाह लावून देण्यात येणार असल्याची माहिती बीड येथील कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे व यंत्रणेला मिळताच त्यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. माहिती मिळताच ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकडे हे नंदागौळ येथे विवाहस्थळी गेले. परंतु तोपर्यंत लग्नसोहळा पार पडला होता. याचदरम्यान परळी पोलिसही विवाहस्थळी दाखल झाल्याने विवाह सोहळ्याचे सर्व सामान घेऊन वऱ्हाडी मंडळी पसार झाली.

कुणालाही अटक नाही
याप्रकरणी ग्रामसेवक मुकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलाचे वडील गोविंद महादू गित्ते, आई सुलोचना गित्ते, काका विष्णू महादू गित्ते, अल्पवयीन मुलीचे वडील केशव बडे, आई सुमन बडे मुला-मुलीचे मामा, लेंडेवाडी येथील मंडपवाले, फोटोग्राफर, लग्न लावणारे पंडित, आचारी व वऱ्हाडी अशा १५० ते २०० जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याचे सपाेनि मारुती मुंडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...