आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:केज शहरात 23 मंडळांनी घेतले परवाने; प्रशासनाकडूनही उत्सवाची जय्यत तयारी

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेली दोन वर्षे सार्वजनिक उत्सवात खंड पडला होता. यंदा गणेश भक्तांमध्ये उत्साह वाढला असून, परवानगी घेऊन श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी गणेश मंडळाची जोरदार तयारी सुरू आहे. पोलिस प्रशासनाकडून शांतता कमिटीच्या बैठका घेत मंडळांना सूचना दिल्या आहेत. तर नगरपंचायतीने रस्त्यावरील खड्डे भरण्यासोबत नाल्यांची स्वच्छता केली जात आहे.

केज शहरात दरवर्षी साधारण २१ आणि ग्रामीण भागात ७० गणेश मंडळाकडून गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. शहरातील गुंड गल्लीतील महाराजा गणेश मंडळ, लोंढे गल्लीतील संगम गणेश मंडळ, हनुमान गल्ली गणेश मंडळ, माळी गल्लीतील त्रिमूर्ती गणेश मंडळ, गांधी चौकातील व्यापारी गणेश मंडळ हे शहरातील पाच मानाचे गणपती आहेत. गणेश मंडळांकडून परवान्यासाठी पोलीस प्रशासनाकडे ऑनलाइन अर्ज करीत आहेत. आतापर्यंत केज ठाण्याकडे ऑनलाइन अर्ज आलेल्या २३ गणेश मंडळांना परवाना देण्यात आला आहे.

तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी शहरात शांतता कमिटीची बैठक घेऊन मंडळांना आवश्यक त्या सूचना दिली असून केज ठाण्याचे प्रभारी प्रमुख गावात शांतता कमिटीच्या बैठका घेत मंडळांना आवश्यक त्या सूचना देत आहेत. याशिवाय बीटचे जमादार प्रत्येक गणेश मंडळांची भेटी घेऊन गणेश मंडळाना माहिती देत आहेत. दरम्यान, सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी शहरात फिरून गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची व विसर्जन स्थळाची पाहणी केली असून आवश्यक असलेल्या सूचना स्थानिक प्रशासनास दिल्या आहेत.

तर नगरपंचायतीकडून मिरवणूक मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम टाकून भरून घेतले जात असून गणेश मूर्ती स्थापना स्थळाजवळील आवश्यक असलेल्या नाल्यांची मंडळाच्या सूचनेनुसार स्वच्छता करून घेतली जात आहे. गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मंडळांकडून जोरदार तयारी सुरू असून परवान्यासह इतर सर्व तयारी पूर्ण करून घेण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका टोळीसह एकावर तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठविला असून २५ लोकांवर कारवाई केली आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आरसीबी प्लाटून, १० पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड, ५० स्वयंसेवक असा जवळपास २०० लोकांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. बीटचे जमादार प्रत्येक मंडळाची भेट घेत कॉर्नर बैठका घेत आहेत, असे एपीआय शंकर वाघमोडे यांनी सांगितले.

नगरपंचायतीकडून रोषणाई, मंडळांना बक्षिसेही देणार
केज नगरपंचायतीकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मंगळवार पेठ या रस्त्यावर रोषणाई करण्यात येणार अाहे. उत्कृष्ट उपक्रम राबविणाऱ्या तीन गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय, तृतीय अशी तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्वच्छतेचही कामेही युध्द पातळीवर सुरू आहे, अशी माहिती जनविकास आघाडीचे प्रमुख हारुण इनामदार व नगराध्यक्षा सीता बनसोड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...