आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ इन्शुरन्सने जपले विमा कंपन्यांचे ‘आरोग्य’:बिगर आयुर्विमा क्षेत्रात आरोग्य विम्याचा वाटा 45%, मोटार विम्यापोटी 18% रक्कम जमा

अमोल मुळे | बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर राज्यात आरोग्य विमा काढण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसत आहे. राज्यात मागील वर्षभरात बिगर आयुर्विमा क्षेत्रातील विमा काढण्यात सुमारे १६% वाढ झाली आहे. बिगर आयुर्विमा क्षेत्रातील विमा पॉलिसीमधून वर्षभरात जमा झालेल्या विमा हप्त्यांच्या रकमेत आरोग्य विम्याचा वाटा तब्बल ४५% आहे. पाठोपाठ वाहन विम्याचा वाटा १८% आहे. राज्याच्या आर्थिक पहाणी अहवालातून ही बाब समोर आली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये सर्वाधिक आरोग्य विमा काढला गेला.

कोरोनाकाळात अनेक कुटुंबीयांची रुग्णालयांची बिले लाखोंच्या घरात गेली. सर्व पुंजी उपचारांवर खर्च करावी लागली. त्यानंतर नागरिकांत आरोग्य विम्याचे महत्व वाढले. यातून विमा कंपन्यांच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून दिसून येत आहे. २०२२ मध्ये अखिल भारतीय स्तरावर बिगर आयुर्विमा क्षेत्रात ३१ कंपन्या कार्यरत होत्या. या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत १६% वाढ नोंदवली गेली आहे. राज्यात एकूण बिगर आयुर्विमा क्षेत्रात वर्षभरात ५१,९५९ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. त्यामध्ये ४५% विमा रक्कम केवळ आरोग्य विम्यापोटी जमा झाले आहेत.

बिगर आयुर्विमा क्षेत्र व रक्कम २०२१-२२ मध्ये बिगर आयुर्विमा क्षेत्रांपैकी आगीच्या संदर्भाने काढलेल्या विम्यातून वर्षभरात ५ हजार ४५ कोटी, मोटार विम्यातून ३ हजार ७८१ कोटी, थर्ड पार्टी विमा ५ हजार ५७६ कोटी, वैयक्तिक अपघात विम्यापोटी २ हजार १९५ कोटी, आरोग्य विम्यापोटी २३ हजार ३०१ कोटी, पीक विम्यापोटी ५ हजार ५६१ कोटी, संकीर्ण म्हणजे कर्ज, विदेशी वैद्यकीय व्यवसाय, प्रवास, सागरी मालवाहतूक, एव्हिएशन, अभियांत्रिकी क्षेत्र विम्यातून ६ हजार ५०० कोटी असे एकूण ५१ हजार ९५९ कोटी रु. जमा झाले.

आरोग्य विमा तीन वर्षात सर्वाधिक २०१९-२० मध्ये आरोग्य विम्यापोटी १४ हजार ७८१ कोटी रुपये जमा झाले होते. २०२०-२१ मध्ये १८ हजार ३५३ कोटी रुपये जमा. २०२१-२२ मध्ये २३ हजार ३०१ कोटी रुपये जमा झाले ही मागील तीन वर्षांतील सर्वाधिक आकडेवारी.

आयुर्विम्यातून ८६ हजार कोटी रुपये आपत्कालीन परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक जोखमीपासून संरक्षण करणारे विमा हे प्रभावी साधन. राज्यात आयुर्विमा क्षेत्रात २४ कंपन्या कार्यरत. २०२१-२२ मध्ये एकूण आयुर्विमा व्यवसायात एलआयसीचा वाटा २% वाढून ६४.२% झाला. २०२१-२२ मध्ये राज्यात ३३ लाख ७५ हजार जणांनी आयुर्विमा काढला. ११ लाख ३३ हजार जणांनी खासगी कंपनी तर २२ लाख ४२ हजार जणांनी एलआयसीकडून विमा काढला. यातून ८६ हजार १३५ कोटी रुपये जमा झाले.