आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:दोन वर्षांमध्ये बर्दापूर अन् अंबाजोगाई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अपघातात 57 जण ठार

अंबाजोगाई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर बर्दापूर फाट्यावर सतत होत असलेल्या अपघाताची गंभीर दखल जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रीतम मुंडेंनी घेतली असून २४ एप्रिल रोजी रस्ता चौपदरीकरणाच्या मागणीचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे. ३ मे सकाळी ११ वाजता स्वत: खासदार अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रस्त्याची स्पॉट पाहणी करणार आहेत.

अंबाजोगाई लातूर महामार्गावरील वाढत्या अपघातानंतर दैनिक दिव्य मराठीने बीड जिल्हा हद्दीतील बर्दापूर फाटा ते लोखंडी सावरगाव रस्त्यावरील लातूर चौकापर्यंत या अडतीस किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, यासाठीचे वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा सुरू केला आहे. जेणेकरून रस्त्यावरील वाढते अपघात थांबवून नागरिकांचे हकनाक बळी जाणार नाहीत यासाठीचा प्रयत्न आहे.

लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर विशेषत: बर्दापूर फाट्यानजीक सतत होणारे अपघात काळजीचा विषय बनला आहे. बर्दापूर फाटा ते अंबाजोगाई चारपदरी रस्त्याची मागणी जनतेमधून होत आहे. मागच्या आठवड्यात याच रस्त्यावर दोन मोठे अपघात होऊन दहा पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला.

वर्तमान परिस्थितीची जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रीतम मुंडेंनी गंभीर दखल घेत मागच्या आठवड्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून उर्वरित रस्ता चारपदरी करण्याची मागणी केलेली आहे. ३ मे रोजी स्वत: खासदार अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या रस्त्यावर ज्या ठिकाणी अपघात होतात त्या पॉइंटची स्पॉट पाहणी करणार आहेत. काल त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता स्वामी यांना संपर्क करून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.

उदा. चारपदरीकरणाचा तत्काळ प्रस्ताव पाठवणे आणि जिथे अपघात होतात त्या पॉइंटवर स्पीड ब्रेकर आणि नामफलक लावणे. अंबा कारखान्याजवळील प्रलंबित पडलेल्या पुलाचे बांधकामही सुरू करण्याच्या बाबतीत खात्याअंतर्गत हालचाली सुरू झाल्याचे समजते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली स्पॉट पाहणी केल्यानंतर लोकांच्या मागणीनुसार सदर रस्त्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी आशा आहे.

रस्त्याचे चौपदरीकरण होणे आवश्यकच, ग्रामस्थांची मागणी
दोन वर्षांमध्ये २९ एप्रिल २०२२ पर्यंत ५७ जण अपघातात ठार झाले आहेत. त्यामध्ये बर्दापूर पोलिस स्टेशन हद्दीत ४२ ठार, तर अंबाजोगाई ग्रामीण स्टेशन हद्दीत अपघात होऊन १५ ठार झाल्याची नोंद आहे. त्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण करा, अशी मागणी नागरिकांनी केली.

३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित
लातूर-अंबाजोगाई ५४८ बी महामार्गावरील बीड जिल्हा हद्दीपासून (बर्दापूर फाटा) लोखंडी सावरगाव लातूर चौकापर्यंत अंदाजे ३८ किलोमीटरचा हा रस्ता सध्या दोन पदरी आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रत्यक्षात सर्व्हे केल्यानंतरच लागणारा खर्च निश्चित करण्यात येऊ शकतो. दरम्यान, या ठिकाणी आवश्यक असलेले पूल बांधावे लागतील. तसेच त्याच्या अनुषंगाने इतर कामे महत्त्वाची आहेत.
- अमित उबाळे, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग

बातम्या आणखी आहेत...