आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारी:नेत्यांच्या तोंडावर मास्क; कार्यकर्त्यांची गर्दी, नियमांचा पडला विसर

बीड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नगरविकास मंत्री शिंदेंच्या उपस्थितीत कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

तालुक्यातील अंथरवणपिंप्री येथे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या वतीने आयोजित शुक्रवारी पाचशे बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. परंतु, या कार्यक्रमास शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या नेत्यांच्या तोंडावर मास्क दिसले. परंतु, कार्यकर्ते अगदी स्टेजवर गर्दी करत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला होता. कोविड नियमांचा विसर पडल्याचे चित्र येथे दिसून आले. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख खांडे व शिवसेनेच्या वतीने अंथरवणपिंप्री तांडा येथील दिनेश पवार यांच्या सद्गुरु बंजारा सेवा संचलित माध्यमिक आश्रमशाळेत पाचशे बेडचेे स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटर उभारले. या सेंटरचे शुक्रवारी दुपारी राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

याप्रसंगी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित, सुरेश नवले, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे, किसान सेनाप्रमुख परमेश्वर सातपुते, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण, नगरसेवक भीमराव वाघचौरे यांची प्रामुख्याने उपस्थिती हाेती. परंतु, या कार्यक्रमात व्यासपीठावर नेत्यांबरोबरच पाठीमागच्या बाजूने कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. नेत्यांनी मास्कचा वापर केला हाेता. परंतु, कार्यकर्त्यांत फिजिकल डिस्टन्सिंग दिसून आले नाही. एखाद्या सभेसारखेच या कार्यक्रमाला स्वरूप आले होते. व्यासपीठाच्या समोरून कार्यकर्ते नेत्यांचे फोटो काढत होते, तर काही जण सेल्फी घेत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना कोरोनाच्या नियमाचा विसरच पडल्याचे दिसून आले.

संकटाच्या काळात धावून जाण्याची शिकवण
बीडच्या ग्रामीण जनतेसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करत अाहाेत. या जिल्ह्याला काहीही कमी पडू देणार नाही. शिवसेनाप्रमुखांनी आम्हा शिवसैनिकांना संकटाच्या काळात मदतीला धावून जाण्याची शिकवण दिलेली अाहे. शिवसैनिक कोरोना संकटात काम करत आहे. जिल्हाप्रमुख खांडे यांनी हे सेंटर उभारून बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक असल्याचे दाखवून दिल्याचे मंत्री शिंदे म्हणाले.

नगरविकास मंत्री शिंदेंच्या उपस्थितीत कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
कोविड सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात नगरविकास मंत्री शिंदेंसह इतर नेत्यांनी तोंडावर मास्क लावललेे होते. परंतु, फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला होता.

बातम्या आणखी आहेत...