आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेज तालुक्यातील पळसखेडा येथे शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्रावर हरभरा खरेदीचा शुभारंभ मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय खाद्य निगम मंडळ, कार्यालय औरंगाबाद, महा एफपीसी पुणे व पळसखेडा अॅग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पळसखेडा येथे शासकीय हमीभाव योजना २०२२ अंतर्गत हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्या हस्ते करण्यात आला. याअंतर्गत शासकीय हमीभाव ५२३० रुपये दराने ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हरभरा पिकाची शासनामार्फत खरेदी करण्यात येणार आहे. ही योजना परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन लोहिया यांनी केले.
बीडच्या एफपीसी फेडरेशनचे अध्यक्ष तथा बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी कंपन्यांमार्फत चालवण्यात येत असलेल्या हमीभाव खरेदी केंद्राचे समन्वयक अभिमान अवचार यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सक्षम होत शेतकरी हितासाठी विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. एफसीआयचे प्रतिनिधी मुकेश मीना यांनी खरेदी प्रक्रिया ही पारदर्शक असून शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर मेसेज येणार असल्याचे सांगून शासन शेतकऱ्यांना १० दिवसांच्या आत खात्यावर पैसे देणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाला सर्व संचालक, सभासद, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.